शहरातील रस्त्यांच्या वाईट अवस्थेस एकटी महापालिका जबाबदार नसल्याचे सांगत महापौर कला ओझा यांनी रस्त्यांच्या प्रश्नी आमदारांनी स्थानिक विकास निधी वापरलाच नसल्याचा आरोप केला. सोमवारी औरंगाबाद येथे या अनुषंगाने आंदोलन होणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर पत्रकार बैठक घेऊन महापौर ओझा यांनी रस्त्याच्या दुरवस्थेस आमदारही तेवढेच दोषी असल्याचा आरोप केला.
 शिवसेना आणि भाजपची बदनामी व्हावी आणि त्याचा राजकीय फायदा मिळावा म्हणून हे आंदोलन केले जात असल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार बैठकीत केला. सिडको, हडको भागातील रस्त्यांची पाहणी केल्यानंतर त्या बोलत होत्या. विविध विकासकामांसाठी सरकारकडे वारंवार निधीची मागणी करण्यात आली. मात्र, पुरेशा प्रमाणात निधी मिळत नाही. आमदारही रस्ते उभारणी आणि दुरुस्तीसाठी पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे काही भागात रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. रस्त्याच्या कामासाठी किमान ६० ते ७० कोटी रुपयांची गरज असल्याची माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ही रक्कम उभी करण्यासाठी कर्ज काढण्याच्या प्रस्तावावरही चर्चा सुरू आहे. शहरातील काही रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट असल्याने महापालिकेवर सतत टीका होत आहे.

Story img Loader