विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागताच विद्यमान आमदार आणि इच्छुक नेते आक्रमक झाले असून आपण ‘कार्यसम्राट’ असल्याचे ‘दाखवून देण्या’साठी अनेकांची धडपड सुरू आहे. कुलाब्यापासून दहिसर-मुलुंडपर्यंत अनेक ठिकाणी नगरसेवकांनी केलेल्या कामांचे श्रेयही लाटण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. या प्रकारामुळे आमदार आणि नगरसेवकांमध्ये वादाची ठिणगी पडू लागली असून संतप्त नगरसेवक आपापल्या ‘गॉडफादर’करवी आमदारांना शह देण्यासाठी व्यूहरचना करीत आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले
आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपाई महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशामुळे या तिन्ही पक्षांचे विद्यामान आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्ते विधानसभेत जाण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदारही आपल्यालाच उमेदवारी मिळणार अशा थाटात वावरत आहेत. मुंबईमध्ये अनेक भागांतील आमदारांनी आपण ‘कार्यसम्राट’ असल्याचे मतदारांना ‘दाखवून देण्या’चे प्रयत्न सुरू केले आहेत. विभागातील पाणी, कचरा अथवा अन्य नागरी समस्यांनी गांजलेल्या मतदारांच्या मदतीला धाऊन जाण्याचा सपाटा आमदारांनी लावला आहे. ही कामे महापालिका पातळीवरील असल्याने आमदार त्यात लुडबूड करीत असल्याने नगरसेवक प्रचंड संतप्त झाले आहेत.
महापालिकेने तसेच नगरसेवक निधीतून
नगरसेवकांनी विभागांमध्ये केलेल्या छोटय़ा-मोठय़ा कामांवर आमदारांचा डोळा आहे. आपण केलेली कामे आमदार स्वत:च्या नावावर खपवू लागल्याने नगरसेवक संतापले आहेत. पालिकेच्या कामांचे श्रेय लाटणाऱ्या विरोधी पक्षाच्या आमदाराला वठणीवर आणण्याचे प्रयत्न काही नगरसेवकांनी सुरू केले आहेत. मात्र स्वपक्षाच्या आमदाराची लुडबूड कशी थांबवायची असा प्रश्न नगरसेवकांना पडला आहे. आमदारांचे हे वर्तन वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्नही नगरसेवक करू लागले आहेत. शिवसेना-भाजपमधील नगरसेवकांना तर आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यासाठी त्यांनी कामाचा सपाटा लावला असून ते मतदारांशी संपर्क वाढवू लागले आहेत.
कोणतीही निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी
कुमक आवश्यक असते. परंतु नरेंद्र मोदी यांच्यामुळे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशामुळे शिवसेना, भाजप आणि रिपाईमधील कार्यकर्त्यांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत. यावेळी महायुतीचा विजय पक्का आहे, असा समज झाल्यामुळे कार्यकर्तेही विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीसाठी इच्छुक असल्याने राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे.
नगरसेवकांच्या कामांवर आमदार ‘कार्यसम्राट’
विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागताच विद्यमान आमदार आणि इच्छुक नेते आक्रमक झाले असून आपण ‘कार्यसम्राट’ असल्याचे ‘दाखवून देण्या’साठी अनेकांची धडपड सुरू आहे.
First published on: 18-06-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mlas showing who did more work