कल्याण-डोंबिवली शहरात येत्या काही दिवसांत एमएमआरडीएच्या माध्यमातून तब्बल ७०० कोटी रुपयांची विकासकामे होणार असून मंगळवारी मंत्रालयात आयोजित एका बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले.  डोंबिवली पश्चिम विभागातील मोठागांव ठाकुर्ली ते माणकोली दरम्यान खाडीवर पूल व जोडरस्ता (अंदाजे २०० कोटी रुपये) तसेच मुंब्रा बायपास (भारत गिअर जंक्शन) येथे उड्डाण पूल उभारणे (५३ कोटी २५ लाख रुपये) या दोन्ही कामांच्या निविदा महिन्याभरात निघणार आहेत. त्याचप्रमाणे शिळफाटा येथे उड्डाण पूल बांधण्याच्या कामासाठी सल्लगार नेमण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सध्या कल्याण-डोंबिवली शहरांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता वाहतुकीच्या सोयीसाठी बाह्य़ रस्ते (रिंगरूट) उभारण्यासाठी अंदाजे ३५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी भूसंपादन करणे तसेच सविस्तर तांत्रिक अहवाल बनविण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
या बैठकीत स्थानिक खासदार आनंद परांजपे यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून उल्हासनगर, अंबरनाथ तसेच ग्रामीण भागातही मूलभूत सुविधांची कामे व्हावीत, अशी भूमिका मांडली. पालकमंत्री गणेश नाईक, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सारिका गायकवाड, एमएमआरडीएचे मुख्य अभियंता एस. बी. तामसेकर, कार्यकारी अभियंता सुनील देशमुख आदी या बैठकीस उपस्थित होते.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा