मुंबई शहर आणि उपनगरात तसेच महानगर प्रदेशातील रेल्वे स्थानकांच्या परिसरात रेल्वेने ये-जा करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी कोटय़वधी रुपये खर्चून बांधलेल्या आकाश मार्गिका (स्कायवॉक) ‘एमएमआरडीए’साठी आता अडचणीच्या ठरू लागल्या आहेत. त्यामुळे निरुपयोगी आकाश मार्गिकांची धोंड आता महापालिकांच्या गळ्यात मारण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला असून तसा प्रस्ताव महापालिकांना धाडला आहे. मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने या प्रस्तावास जोरदार विरोध केला आहे.
मुंबई शहर आणि उपनगर तसेच महानगर प्रदेशातील ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा-भाइंदर अशा रेल्वे स्थानकांच्या परिसरात ४६३.२८ कोटी रुपये खर्चून एमएमआरडीएने ३६ आकाश मार्गिका बांधल्या. रेल्वे स्थानकांच्या परिसरात रेल्वेने ये-जा करणारे प्रवासी, बस, टॅक्सी, खाजगी वाहने इत्यादींमुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच फेरीवाल्यांकडून पदपथावर झालेली अतिक्रमणे, वाहनतळांचा अभाव, पदपथ अस्तित्वात नसणे आदी कारणांमुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकांच्या परिसरातून जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकांच्या परिसरातून विनासायास बाहेर पडता यावे यासाठी या आकाश मार्गिका असून त्याचा लोकांना फायदाच होईल असा दावा करीत एमएमआरडीएने ही योजना राबविली. मात्र चहुबाजूंनी त्यावर टीका झाल्यानंतर ही योजना अध्र्यावरच गुंडाळण्यात आली. सर्वेक्षण करून आणि लोकांच्या मागणीप्रमाणे या आकाश मार्गिका बांधण्यात आल्याचा दावा प्राधिकरणाकडून केला जात असला तरी राजकीय हस्तक्षेप आणि कंत्राटदारांची मनमानी यामुळे लोकांपेक्षा कंत्राटदारांच्या हिताला प्राधान्य देऊन या मार्गिका बांधण्यात आल्याचा आक्षेप एमएमआरडीएला आजही खोडून काढता आलेला नाही. त्यातच विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या या आकाश मार्गिका एमएमआरडीएसाठी आता पांढरा हत्ती ठरू लागल्या आहेत. त्यामुळे या सर्व आकाश मार्गिका संबंधित महापालिकांच्या गळ्यात मारण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. एमएमआरडीएच्या या प्रस्तावास शिवसेनेने विरोध केला आहे. प्रकल्प उभारायचे, त्यातून पैसै घ्यायचे आणि नंतर ते सांभाळायला आम्हाला द्यायचे हा कसला न्याय, असा सवाल महापौर सुनील प्रभू यांनी केला आहे. एमएमआरडीएने मुंबईतून मिळणारे सर्व उत्पन्न आम्हाला द्यावे. मग त्यांचे सर्व प्रकल्प आम्ही सांभाळू, अशी भूमिका घेत त्यांनी या प्रस्तावास विरोध केला आहे. दरम्यान महापालिकेकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता राज्य सरकारच्या माध्यमातून या आकाश मार्गिका महापालिकेच्या गळ्यात मारण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून लवकरच नगरविकास विभागाच्या माध्यमातून महापालिकेस तसे आदेश देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काय आहे या प्रस्तावात?
मुंबईतील अंधेरी, सांताक्रूझ, दहिसर, बोरिवली, वांद्रे,भांडुप, कांजुरमार्ग, विद्याविहार, घाटकोपर, चेंबूर, विक्रोळी, सायन, विलेपार्ले, गोरेगाव, कांदिवली, ग्रँट रोड, वडाळा, कॉटनग्रीन या ठिकाणी बांधण्यात आलेल्या २३ आकाश मार्गिका पालिकेने ताब्यात घ्याव्यात आणि त्याची देखभाल करावी, असा प्रस्ताव एमएमआरडीएने मुंबई महापालिकेला दिला आहे. या आकाश मार्गिकेवर जाहिरात लावून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून महापालिकेस फायदाच होईल, असा दावाही करण्यात आला आहे. वांद्रे येथील मार्गिकेवरील जाहिरातीच्या माध्यमातून प्राधिकरणाला सध्या महिना सात लाख रुपये मिळत असल्याचे त्यात नमूद आहे, मात्र अन्य कोणत्याही आकाश मार्गिकेवर जाहिरात करण्यास कोणी इच्छुक नाहीत, याचा उल्लेख केलेला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा