उंचच उंच इमारतींची वसाहत..पण जागोजागी फुटलेल्या सांडपाणी वाहिन्या, रस्त्यावर जिकडेतिकडे कचरा पडलेला, लिफ्ट असल्या तरी बंद असल्याने रोजच ‘ट्रेकिंग’चा अनुभव हे गोरेगावातील ‘एमएमआरडीए’तर्फे बांधण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतीमधील सहा हजार कुटुंबांसाठी नित्याची कटकट झाली आहे. मुंबई ‘धावती’ राहण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या शेकडो कोटींच्या प्रकल्पांसाठी आपली जागा सोडून मोठय़ा आशेने आलेल्यांची ही फरफट आणि वसाहतीच्या विद्रुप चेहऱ्यामुळे प्राधिकरणाच्या कथित कार्यक्षमतेचे पितळ उघडे पडले आहे.
गोरेगाव पश्चिमेला ओशिवरातील ‘एमएमआरडीए’ची प्रकल्पग्रस्तांची वसाहतच समस्याग्रस्त झाली आहे. तब्बल सहा हजार कुटुंब आणि सुमारे ३० हजार लोक या वसाहतींमध्ये राहतात. पण साधे एक आरोग्य केंद्रही त्यांच्यासाठी बांधण्यात आलेले नाही. वसाहतीमधील समस्यांबाबत वारंवार तक्रारी झाल्या, पण शेकडो कोटींच्या प्रकल्पांत गुंतलेल्या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने काणाडोळा केला जात होता. अखेर या वसाहतीमधील रहिवाशांचे नशीब उजाडले आणि खुद्द ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त यूपीएस मदान यांनी तब्बल २० अधिकाऱ्यांच्या फौजफाटय़ासह या वसाहतीला भेट दिली. त्यात या वसाहतीच्या दुरावस्थेचा चेहराच या दौऱ्यात उघडा पडला.
सांडपाणी वाहिन्या फुटलेल्या, रस्त्याची अवस्थाही वाईट, नियमित झाडलोट होत नसल्याने ठिकठिकाणी कचरा पडलेला ही वसाहतीची अवस्था पाहून ते आवाक झाले. सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या मुख्य सांडपाणी वाहिनीला नीट जोडलेल्या नाहीत व त्यामुळे सातत्याने सांडपाणी वाहत असते. यातून आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून सतत या वसाहतीमधील लोक आजारी पडत असल्याबाबतची आकडेवारी कार्यकर्ते सुलेमान भिमानी यांनी मदान यांना दिली.
या वसाहतीच्या इमारतींमध्ये लाखो रुपये खर्च करून लिफ्ट बसवण्यात आल्या आहेत. पण त्यापैकी अनेक लिफ्ट बंद आहेत. काही ठिकाणी चोरटय़ांनी लिफ्टचे काही भागच लांबवले. त्यामुळे लाखोंचा खर्च वाया जात आहे, याकडेही मदान यांचे लक्ष वेधण्यात आले. सारे चित्र पाहिल्यावर लवकरच परिस्थिती बदलण्यासाठी कार्यवाही करण्याचे आश्वासन मदान यांनी दिले. आता परिस्थिती खरेच पालटते काय याकडे या ३० हजार प्रकल्पग्रस्तांचे डोळे लागले आहेत.