सालाबादाप्रमाणे यावर्षीही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबईतील त्याच त्याच पायाभूत सुविधा प्रकल्पांची भेट २०१४ मध्ये देण्याचे वचन दिले आहे. पण दरवर्षी या प्रकल्पांचा मुहूर्त हुकत असल्याने यंदा प्राधिकरणाने हे प्रकल्प नेमके कधीपर्यंत वा कोणत्या महिन्यात पूर्ण होणार याचे मुहूर्त सांगण्याचा मोह आवरता घेत ‘झाकली मूठ सव्वा लाखा’ची असे धोरण स्वीकारले आहे. काही वर्षांपूर्वी प्राधिकरणाचे तत्कालीन महानगर आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या काळात दणकून घोषणा करण्याचे, प्रकल्प पूर्ण होण्याचे महत्त्वाकांक्षी मुहूर्त जाहीर करण्याचे तंत्र ‘एमएमआरडीए’ने अवलंबले होते. ते मागच्या वर्षीपर्यंत सुरू राहिले. दरवर्षी नवीन वर्षांच्या सुरुवातीला जाहीर केलेले मुहूर्त गाठण्यात अपयश येत असल्याने ‘एमएमआरडीए’च्या प्रकल्पांचे मुहूर्त हा चेष्टेचा विषय झाला होता. नवीन महानगर आयुक्त यूपीएस मदान यांनी बहुधा त्यामुळेच आता असल्या तारखांच्या घोषणांना लगाम घातला आहे.
वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वे
११.४ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा सार्वजनिक वाहतुकीचा प्रकल्प. एकूण १२ स्थानके. वसरेवा-घाटकोपर अंतर ७० मिनिटांवरून २० मिनिटांवर येईल. चार डब्यांच्या मेट्रोची प्रवासी क्षमता ११७८ आहे. मूळ प्रकल्प खर्च २३५६ कोटी पण आता तो ४८०० कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.
हुकलेले मुहूर्त : १. जुलै २०१०, २. सप्टेंबर २०१०, ३. जुलै २०११, ४. मार्च २०१२, ५. नोव्हेंबर २०१२, ६. मे २०१३, ७. सप्टेंबर २०१३, ८. डिसेंबर
चेंबूर-वडाळा मोनोरेल पहिला टप्पा
चेंबूर ते वडाळा हा ८.८० किलोमीटर लांबीचा टप्पा. त्यावर सात स्थानके आहेत. बसद्वारे खडबडीत रस्त्यांवरून होणारा पाऊण तासाचा खडतर प्रवास वातानुकूलित मोनोरेलमधून अवघ्या १९ मिनिटांत होईल. चार डब्यांच्या मोनोरेलची प्रवासी क्षमता ५६८ आहे.
हुकलेले मुहूर्त :  १. डिसेंबर २०१०, २. मे २०११, ३. नोव्हेंबर २०११, ४. मे २०१२, ५. डिसेंबर २०१२, ६. सप्टेंबर २०१३, ७. डिसेंबर २०१३
पूर्व मुक्त मार्ग टप्पा दोन
पांजरापोळ ते चेंबूर-मानखुर्द जोडरस्त्याचा चौपदरी ३.६५ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग. आणि चेंबूरच्या शिवाजी चौकातील दुसरा बोगदा.
हुकलेले मुहूर्त (पूर्ण मार्गासाठी) : १. जानेवारी २०११ २. एप्रिल २०१२, ३. डिसेंबर २०१३
सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्ता
पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा आणखी एक वाहतूक प्रकल्प. ठाणे आणि नवी मुंबईहून येणाऱ्या आणि तिकडे जाणाऱ्या वाहनांना विमानतळाशी थेट जोडणारा रस्ता. शीव येथे वळसा घालण्याची गरज पडणार नाही. रोज ५० हजार वाहनांना लाभ होणार.
हुकलेले मुहूर्त :  १. नोव्हेंबर २००४,  २. सप्टेंबर २००६, ३. डिसेंबर २००८ ४.,  डिसेंबर २००९, ५. जून २०१०,  ६. जून २०११.,  ७. डिसेंबर २०११ ८. डिसेंबर २०१२, ९. मार्च २०१३, १०. ऑक्टोबर २०१३,  ११. डिसेंबर २०१३