गुलाबी रंगाची मोनोरेल चेंबूर-वडाळा मार्गावर मोठय़ा दिमाखात धावली आणि मुंबईत आरामदायी प्रवासाच्या नव्या पर्वाचे दालन उघडल्याचा गाजावाजा झाला आणि ‘मोनो’साठी जितका खर्च अपेक्षित आहे तितकाच खर्च ‘मेट्रो’साठी येत असला तरी ‘मेट्रो’ची प्रवासी वाहतूक क्षमता दुप्पट असल्याने महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) आता ‘मेट्रो’चाच पर्याय उत्तम वाटत आहे.
मुंबई आणि महानगरप्रदेशात प्रवासी वाहतुकीची पर्यायी साधने उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून ‘एमएमआरडीए’ने मेट्रो रेल्वे आणि मोनोरेल असे दोन प्रकल्प हाती घेतले. मोनोरेलच्या पहिल्या टप्प्यावर चाचणी झाली असताना मेट्रो रेल्वे मार्गाचे बांधकाम अद्याप सुरू आहे. तर चारकोप-वांद्रे-मानखुर्द या दुसऱ्या मेट्रो रेल्वेचे काम साडेतीन वर्षांपासून प्रलंबित आहे. पण तरीही ‘एमएमआरडीए’ने कुलाबा ते सीप्झ या तिसऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाची तयारी सुरू केली आहे. मात्र, मोनोरेलच्या दुसऱ्या मार्गाबाबत घोषणा तर दूर उलट तोंडावर बोट ठेवण्यात येत आहे.
‘एमएमआरडीए’ने मुंबई महानगर प्रदेशासाठी एकूण १३५.२१ किलोमीटर लांबीचा तब्बल २० हजार २९५ कोटी रुपयांचा सात मार्गावरील मोनोरेल प्रकल्पाचा आराखडा तयार केला होता. तसेच ठाणे-भिवंडी-कल्याण मार्गावरील मोनोरेल प्रकल्पाच्या व्यवहार्यता अभ्यासासाठी सल्लागार कंपनीही नेमली होती. पण मोनोरेल प्रकल्प हा खर्चाच्या तुलनेत प्रवासी वाहतुकीसाठी उपयुक्त नसल्याचे समोर आले. मेट्रो रेल्वे प्रकल्पालाही साधारणपणे तितकाच खर्च येत असताना मेट्रोच्या तुलनेत मोनोरेलची प्रवासी क्षमता निम्म्यापेक्षा कमी आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील गर्दीचे प्रमाण पाहता मोठय़ा प्रमाणात प्रवासी वाहतूक करता येईल, अशा साधनांची गरज आहे. मोनोरेल ही मर्यादित प्रमाणात प्रवासी वाहतूक करू शकते. खर्च आणि प्रवासी वाहतुकीचे प्रमाण, मोनोरेल मार्ग बांधण्यात येणाऱ्या जागेच्या अडचणी पाहता मोनोरेल प्रकल्पाच्या व्यवहार्यतेबाबत व उपयुक्ततेबाबत काही प्रश्न आहेत, असे प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  त्यामुळेच मेट्रो रेल्वेच्या तिसऱ्या टप्प्याचे काम हाती घेण्यापर्यंत पुढे गेलेले प्राधिकरण मोनोरेलच्या दुसऱ्या मार्गाबाबतही गप्प आहे. इतकेच नव्हे तर ठाणे-भिवंडी-कल्याण या मार्गावर मोनोरेल बांधणे परवडणारे नसल्याने ते शक्य नसल्याची स्पष्ट भूमिकाही प्राधिकरणाने घेतली आहे. या सर्व संकेतांमुळे मोनोरेलच्या पुढच्या नियोजित मार्गावर काम करण्यास प्राधिकरण उत्सुक नाही. त्यामुळे चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज मार्गावर धावणारी मोनोरेल ही मुंबईतील पहिली व शेवटची मोनोरेल ठरण्याची शक्यता आहे.
प्रवासी वाहतूक क्षमतेतील तफावत!
चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक या २० किलोमीटर लांबीच्या मार्गावर मोनोरेलचे काम सुरू आहे. यापैकी चेंबूर-वडाळा हा ८.८ किलोमीटरचा पहिला टप्पा ऑगस्ट २०१३ मध्ये वाहतुकीसाठी सुरू होईल तर पुढचा वडाळा ते संत गाडगे महाराज चौक हा दुसरा टप्पा २०१४ च्या मध्यापर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी २३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. पण तो सुमारे तीन हजार कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. मोनोरेलच्या डब्याची प्रवासी क्षमता १४० आहे. चार डब्यांच्या मोनोरेलमधून एका वेळी ५६० प्रवासी प्रवास करू शकतात. वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या ११.४० किलोमीटर लांबीच्या मार्गावरील मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. मेट्रोच्या एका डब्याची प्रवासी क्षमता २९५ असून चार डब्यांची प्रवासी क्षमता ११८० इतकी आहे.  

Story img Loader