पडेल चित्रपटांमध्ये अत्यंत सुमार भूमिका करून प्रकाशझोताबाहेर गेलेल्या एखाद्या नटीने आपल्या सौंदर्यप्रसाधनांवर लाखो रुपये उधळावेत, तशी सध्या देशातील पहिल्यावहिल्या मोनोरेलची अवस्था झाली आहे. मोनोरेलच्या सुरक्षेसाठी दरमहा तब्बल ७६ लाख रुपये एवढा प्रचंड खर्च होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच वेळी मोनोरेलचे दरमहा उत्पन्न फक्त ३२ लाखांच्या घरात असल्याचेही समजते.
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेल्या मोनोरेलने सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. मात्र ‘तेरडय़ाचा रंग तीन दिवस’ या म्हणीप्रमाणे ही लोकप्रियता फक्त कुतूहलापोटी असल्याचे समोर आले. त्यानंतर गेले वर्षभर मोनोरेल चांगलीच तोटय़ात सुरू आहे. असे असले तरी मुंबईतील या मोनोरेलच्या सात स्थानकांत चोख सुरक्षा बंदोबस्त असतो. तसेच आगारांतही कडेकोट सुरक्षा असते. या सुरक्षेपोटी दरमहा ७५.९६ लाख रुपये खर्च होतो, अशी माहिती अनिल गलगली यांना माहिती अधिकारांतर्गत मिळाली.
दरम्यान, गेल्या १४ महिन्यांत म्हणजेच फेब्रुवारी २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत सुमारे ६० लाख प्रवाशांनी मोनोरेलमधून प्रवास केल्याचेही या माहितीद्वारे समोर आले आहे. म्हणजेच मोनोरेलमधून दर दिवशी प्रवास करणाऱ्यांची संख्या १४२८२ एवढी आहे.
 तर मोनोरेलचे महिन्याचे सरासरी उत्पन्न ३२ लाख एवढे असल्याचेही या माहितीद्वारे समजते. तोटय़ात चाललेल्या मोनोरेलच्या सुरक्षेत काहीशी कपात करून हा तोटा कमी करावा, अशी विनंती गलगली यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा