गळक्या इमारती, सर्वत्र साचलेले पाणी, शॉक बसणारे पंखा-दिवे, स्वच्छतागृहांची आबाळ अशा शिवाजी विद्यापीठातील वसतिगृहातील समस्यांचा पाढा सोमवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाचला. प्रकुलगुरू अशोक भोईटे, कुलसचिव डॉ.डी.व्ही.मुळे, परीक्षा नियंत्रक डॉ.बी.एम.हिर्डेकर यांच्या सोबत झालेल्या चर्चेवेळी कार्यकर्त्यांनी हा विषय लावून धरला. डॉ.भोईटे यांनी आठवडाभरात वसतिगृहातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय जाहीर केला.     
कोल्हापूर हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे माहेरघर आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर कर्नाटक येथून शेकडो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी शिवाजी विद्यापीठामध्ये दाखल होतात. ते विद्यापीठातील वसतिगृहामध्ये राहतात. विद्यापीठाचे वसतिगृह मात्र समस्यांचे आगर बनले आहे. पावसाळा सुरू असल्याने छतातून खोल्यांमध्ये पाणी गळत असते. पाण्याचा निचरा होत नसल्याने खोल्यांमध्ये पाणी साचून राहते. भितींमध्येही पाण्याचा ओलावा राहिल्याने पंखा, दिवे सुरू करताना अनेक विद्यार्थ्यांना शॉक बसला आहे. परिणामी विद्यार्थी दिवे सुरू करताना चक्क काठीचा वापर करतात. खोल्यांमध्ये पाणी साचून राहिले असले तरी पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. स्वच्छतागृहांची आबाळ झाली आहे. अशा समस्यांमुळे विद्यार्थी संत्रस्त झाले आहेत.     
या समस्या घेऊन मनसेचे जिल्हाध्यक्ष अभिजित साळोखे, शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले, जिल्हा सचिव प्रसाद पाटील, नीलेश लाड, राजू समर्थ, मिथुन गर्दे यांच्यासह मनसैनिकांनी विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या चर्चेवेळी त्यांनी वसतिगृहातील समस्यांचा पाढा वाचला. त्यावर वरीलप्रमाणे कार्यवाहीचे आश्वासन मिळाले.
 

Story img Loader