महापौर पदाच्या निवडप्रसंगी एकमेकांना पाण्यात पाहणारे मनसे व शिवसेना पालिकेच्या प्रभाग समिती निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले असून मनसे-भाजप- शिवसेना या महायुतीचे समीकरण प्रथमच जुळल्याने आगामी काळात स्थानिक पातळीवर प्रामुख्याने पालिकेच्या राजकारणात आमुलाग्र बदल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेने मनसेशी साथसंगत करण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीच्या महाआघाडीत फूट पडली आहे. काही प्रभाग समिती सभापतीपदांची अविरोध झालेली निवडणूक, हे त्याच बदलाचे निदर्शक होय. सोमवारी झालेल्या निवडणुकीत चारपैकी प्रत्येकी दोन प्रभाग समित्यांवर मनसे व शिवसेनेला वर्चस्व प्रस्थापित करता आले.
महापालिकेत सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या मनसेला काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना-रिपाइंच्या महाआघाडीने गतवर्षी चांगलेच झटके दिले होते. महापालिकेत भाजपच्या साथीने सत्ता काबीज करणाऱ्या मनसेला पालिकेची तिजोरी समजली जाणारी स्थायी समिती तसेच चार प्रभाग समित्यांवर वर्चस्व प्रस्थापित करता आले नाही. परिणामी, महापालिकेच्या कारभारात विरोधकांच्या अडथळ्यांचा सामना करता करता सत्ताधारी मनसेच्या नाकीनऊ आले. वर्षभरात घडलेल्या घडामोडी भविष्यात अधिक त्रासदायक ठरणार असल्याचे लक्षात घेऊन मनसेने शिवसेनेशी जुळवून घेत गणित सोपे करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. त्याची मुहूर्तमेढ प्रभाग समिती निवडणुकीतून रोवली गेल्याचे स्पष्ट झाले. महापालिकेच्या सहा प्रभाग समितीपैकी चार प्रभाग समितीपदांची निवडणूक सोमवारी झाली. त्यात सत्ताधारी मनसे-भाजपने शिवसेनेला सोबत घेत राष्ट्रवादीच्या महाआघाडीत फूट पाडली आहे.
सोमवारी पंचवटी, नाशिकरोड, सिडको व सातपूर प्रभागांसाठी निवडणूक झाली. त्यात पंचवटी व नाशिकरोड प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक अविरोध झाली. पंचवटीच्या सभापतीपदी मनसेच्या लता टिळे तर नाशिकरोड सभापतीपदी सेनेच्या सुनीता कोठुळे यांची निवड झाली. सिडको सभापतीपदी मनसेचे अरविंद शेळके तर सातपूर सभापतीपदी शिवसेनेचे विलास शिंदे यांची अविरोध निवड झाली.
 शिवसेनेने मनसेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे अल्पमतात असलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या उमेदवारांना माघार घेणे भाग पडले. या दोन्ही प्रभाग समित्यांच्या सभापतीपदासाठी भाजप, व मनसेचेही काही इतर इच्छुक होते. नाशिकरोड प्रभागावर तर भाजपने दावा सांगितला होता. तथापि, तडजोडीच्या राजकारणात सर्वानी आपापले हित लक्षात घेऊन निर्णय घेण्यात धन्यता मानली. पश्चिम प्रभाग समिती व महिला बालकल्याण समितीचे सभापतीपद भाजपला देण्याचे निश्चित झाले आहे.
पहिल्या टप्प्यात चार प्रभाग समित्यांची निवडणूक पार पडली तर दुसऱ्या टप्प्यात म्हणजे मंगळवारी पूर्व व पश्चिम प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. त्या ठिकाणी महायुतीचा फॉम्र्युला वापरून सर्व प्रभाग समित्यांवर कब्जा करण्याचे नियोजन मनसेने केले आहे. पश्चिम प्रभागात भाजपच्या डॉ. राहुल आहेर यांना संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जात असून पूर्व प्रभाग समितीत चुरस होणार असल्याचे दिसत आहे. या ठिकाणी अपक्षांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. प्रभाग समिती निवडणुकीच्या निमित्ताने आकारास आलेली मनसे-भाजप-शिवसेना महायुती आता स्थायी समितीत बदल घडविण्याच्या प्रयत्नात आहे. स्थायीत मनसेचे पाच, शिवसेना व राष्ट्रवादी प्रत्येकी तीन, भाजप व काँग्रेस प्रत्येकी दोन तर अपक्ष गटाचे एक असे बलाबल आहे. शिवसेनेचा पाठिंबा मिळाल्यास मनसे व भाजपचे मिळून दहा सदस्य होतात तर विरोधकांकडे काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्ष गट असे मिळून सहा इतके संख्याबळ होते. हे गृहीतक मांडून सत्ताधारी मनसेने स्थायीवर कब्जा करण्याच्या दृष्टिकोनातून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा