कोणतेही कर्तृत्व नसताना पालिकेतील महिला कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या महापौर पुरस्काराचे पडसाद बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. या महिला कर्मचाऱ्यांना कोणत्या निकषावर पुरस्कार दिले, त्यांच्यासाठी कोणी शिफारस केली होती, असे अनेक प्रश्न उपस्थित करून मनसेने सत्ताधारी शिवसेनेवर हल्लाबोल केला. तर खुद्द शिवसेनेच्या नगरसेविकांनीही या पुरस्कारांवर आगपाखड केली.
‘महापौर पुरस्कारांची खैरात’ या मथळ्यानिशी बुधवारच्या ‘मुंबई वृत्तान्त’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताने महापालिकेत एकच खळबळ उडवून दिली. महिला दिनाच्या निमित्ताने २८ महिलांना महापौर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. परंतु लाभार्थीमध्ये महापालिकेतीलच कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. शाळेत उत्कृष्ट विद्यार्थिनी असलेल्या परंतु आता निवृत्तीच्या उंबरठय़ावर असलेल्या, भ्रष्टाचाराचे आरोप असलेली महिला डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांच्या बढत्या-बदल्यांमध्ये लुडबूड करणारी कर्मचारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्नी आदींनी ही महापौर पुरस्काराची खिरापत वाटण्यात आली. मनसेचे नगरसेवक चेतन कदम यांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत या प्रक्रियेस विरोध दर्शविला. या महिलांसाठी कोणी शिफारस केली, त्यासाठी कोणते निकष लावले आदी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. विशेष म्हणजे शिवसेनेच्या शुभा राऊळ, किशोरी पेडणेकर यांनीही त्यांना पाठिंबा देत महापौरांना घरचा आहार दिला.
कोणतेही कर्तृत्व नसताना कर्मचाऱ्यांनाच अशा पद्धतीने पुरस्काराची खिरापत करणे योग्य नाही. त्या जे काम करीत आहेत, त्यासाठी त्यांना वेतन मिळत आहे. मग पुरस्कार द्यायची गरज काय असे सांगत शिवसेना नगरसेविकांनी विरोध दर्शविला. कुर्ला येथे १ रुपयात रुग्णांना आरोग्य सेवा देणारी एक डॉक्टर महिला आहे. अशा महिलांचा गौरव व्हायला हवा होता, असे मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी सांगितले. या वृत्ताची पालिका वर्तुळामध्ये बुधवारी दिवसभर जोरदार चर्चा सुरू होती. आपण हा पुरस्कार परत करणार असल्याच्या शेख्या मारत एक महिला कर्मचारी फिरत होती. परंतु संध्याकाळपर्यंत तरी तिने हा पुरस्कार परत केला नव्हता. उलटपक्षी या महिला कर्मचाऱ्याची बाजू मांडण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात अनेक दूरध्वनी येत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा