नांदगावचे आमदार जनतेसमोर येण्याचे धाडस करीत नाहीत. महिनोन्महिने जनतेला आमदारांचे दर्शन होत नाही, अशी तक्रार करीत नांदगाव तालुक्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी आ. पंकज भुजबळ यांच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले. शिवसेनेतून मनसेमध्ये प्रवेश केलेले राजेंद्र पवार यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी ही टीका करण्यात आली. यावेळी पवार यांनी तालुक्यात प्रस्थापित काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांना राजकीय शह देण्यासाठी मनसे यापुढे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
नाशिक येथे राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी आपण मनसेत प्रवेश झाल्याची घोषणा पवार यांनी केली. सुमारे दोन हजार कार्यकर्त्यांसह नांदगाव येथे भव्य मेळाव्यात प्रवेश सोहळ्याचा दिमाखदार कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मनसेचे जिल्हा चिटणीस कांतीभाऊ चोभे, तालुका उपाध्यक्ष बबन आव्हाड, शहरप्रमुख सुनील हांडगे, महिला आघाडी शहरप्रमुख स्वाती मगर आदींसह मनसेचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तालुक्यातील अनेक प्रश्न अनेक वर्षांपासून काँग्रेस-राष्ट्रवादी सोडवू शकलेले नाही. मनसेत प्रवेश करताना आमदारकीची उमेदवारी हे चित्र डोळ्यांसमोर ठेवलेले नाही. याबाबतचा निर्णय आगामी काळच ठरवील, असे सूचक विधानही पवार यांनी यावेळी केले.
शहरासाठी पालखेडची ३८ कोटी रुपयांची योजना याआधीच मंजूर आहे. त्यात नवीन काही नाही. या योजनेव्दारे मनमाडचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटेल अशी अपेक्षा करण्यात येत होती. परंतु तसे होणे शक्य नाही. लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सध्या तालुक्यात सुरू असल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे.

Story img Loader