शिवसेनेत नवीन व जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये नव्याने उफाळून आलेल्या वादाचा राजकीय लाभ उचलण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास मनसे सज्ज झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सेनेतील अंतर्गत यादवीमुळे वैतागलेले पदाधिकारी व कार्यकर्ते मनसेत आल्यास त्यांचे स्वागत करण्याची भूमिका स्वीकारत मनसेने नाराज शिवसैनिकांसाठी ‘रेड कार्पेट’ अंथरल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात शिवसेनेची वाताहत होण्यास जिल्हाप्रमुख विजय करंजकर, पालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, गटनेता अजय बोरस्ते हे जबाबदार असल्याचा ठपका ठेवत जुने पदाधिकारी व शिवसैनिकांनी शिवसेना कार्यालयाचा ताबा घेण्याचे जाहीर करत एका मेळाव्यातून असंतोषाला वाट मोकळी करून दिली. दोन ते तीन वर्षांपासून शिवसेनेत नवे व जुने असा वाद सुरू असून त्याची परिणती प्रत्येक निवडणुकीत या पक्षाची वाताहत होण्यात झाली आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांमधील असंतोष उफाळून आला. संबंधिताच्या कार्यशैलीमुळे महापालिका निवडणुकीत पक्षाला पराभवाचे धनी व्हावे लागले, असा आरोप माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल, दत्ता गायकवाड, माजी महानगरप्रमुख अर्जुन टिळे यांच्यासह इतर माजी पदाधिकाऱ्यांनी केला. अंतर्गत यादवीमुळे पक्ष गलीतगात्र झाला असताना स्थानिक पातळीवरील मतभेद मिटत नसल्याने यापूर्वी अनेकांनी इतर पक्षांची वाट धरली. सध्याच्या वादात शिवसेनेच्या कार्यप्रणालीनुसार न वागणाऱ्या पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर झोडपण्याची भाषा करण्यात आल्याने ही स्थिती आणखी चिघळणार असल्याचे दिसत आहे. एकूणच या स्थितीचा पुन्हा एकदा लाभ घेण्याच्या दृष्टीकोनातून इतर राजकीय पक्षांनी व्यूहरचना आखण्यास सुरूवात केली आहे.
या व्यूहरचनेत मनसे आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर स्थानिक पातळीवरील अनेक दिग्गज नेते व कार्यकर्त्यांनी मनसेचा रस्ता धरला. गतवर्षी पालिकेच्या निवडणुकीवेळीही शिवसेनेतील नाराजांचा मोठा गट मनसेसह इतर राजकीय पक्षांना जाऊन मिळाला. सध्याच्या वादाचा परिपाक नाराजांची संख्या वाढण्यात होणार असल्याचे गृहीत धरून मनसेने संबंधितांना आपल्या पक्षाची कवाडे खुली करून दिली आहेत. मंगळवारी मनसेच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत या पक्षाचे सरचिटणीस आ. वसंत गिते यांनी त्यास दुजोरा दिला. शिवसेनेतील वाद हा त्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. या वादामुळे वैतागलेले सेनेतील काही पदाधिकारी मनसेच्या संपर्कात आहेत. मनसे व शिवसेना हे वेगवेगळे पक्ष असले तरी त्यांची नाळ एकच आहे. त्यामुळे या परिस्थितीत शिवसेनेतील आणखी कोणी पदाधिकारी वा कार्यकर्ते मनसेत येण्यास उत्सुक असल्यास त्यांचे स्वागत केले जाईल, असे आ. गिते यांनी पत्रकारांकडे नमूद केले. कुंपणावर बसलेल्या सेनेतील नेत्यांना हा पर्याय देत मनसेने जणू त्यांना एक प्रकारे आवतण दिल्याचे बोलले जात आहे.

मनसेचे सभासद व्हा अन् रोजगार मिळवा!
मनसेने २७ ते ३० जानेवारी या कालावधीत नाशिकमध्ये महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले असले तरी या उपक्रमात कोणालाही रोजगार मिळवायचा असेल तर त्यास प्रथम मनसेचे सभासदत्व स्वीकारणे बंधनकारक आहे. म्हणजे, मनसेचा सभासद नसलेल्या मराठी बेरोजगारास मेळाव्यात रोजगार मिळण्याची शाश्वती नसल्याचे या पक्षाच्या निवेदनावरून लक्षात येते. वेगवेगळ्या क्षेत्रात विविध पदांसाठी ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्याकरिता १० ते १८ जानेवारी दरम्यान अर्ज भरणे बंधनकारक आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आ. वसंत गिते यांनी पत्रकार परिषदेत दिली. महा रोजगार मेळाव्याच्या कालावधीत मनसेच्या राजगड कार्यालयात मुलाखत प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर सहा फेब्रुवारी रोजी महाकवी कालिदास कला मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात निवड झालेल्या उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरूपात नेमणूक पत्रांचे वितरण केले जाणार आहे. स्थानिक उमेदवारांच्या सहभागामुळे राज्यात परप्रांतीयांचे आक्रमण रोखण्यास मदत होईल. ‘मनसेचा निर्धार स्थानिकांना रोजगार’ या पद्धतीने पक्षाने मेळाव्याविषयी जनजागृती केली आहे. पत्रकार परिषदेस आ. गिते यांच्यासह महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, शशिकांत जाधव आदी उपस्थित होते.