जिल्हा परिषद संचलित शहरातील विद्यानिकेतन शाळेतील इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग अचानक बंद करण्यात आल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा मनसेच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. मराठी शाळा बंद करण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांनी केला आहे.
शासनाच्या कोणत्या निर्णयानुसार शाळा बंद करण्यत आली, कोणाच्या दबावाखाली शाळेतील विद्यार्थ्यांचे दाखले देण्यात आले, पंचायत राज अंतर्गत समितीचा जळगाव जिल्हा दौरा याच महिन्यात होणार असल्याने त्या दौऱ्याला घाबरून हा निर्णय घेण्यात आला काय, कोणत्या लेखा परीक्षणात या शाळेवर ठपका ठेवण्यात आला, अशी प्रश्नांची सरबत्ती मनसेने केली असून या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेने द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तडकाफडकी शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी पालकांची सभा घेऊन त्यांना कल्पना देण्यात आली होती काय, सहामाही परीक्षा झाल्यानंतरच नेमका शाळा बंद करण्याचा निर्णय कसा घेण्यात आला, निम्मे शैक्षणिक वर्ष झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आल्याने त्याची जबाबदारी कोणाची, हे प्रश्नही मनसेने निवेदनात उपस्थित केले. शाळेने कोणत्याही विद्यार्थ्यांचे दाखले देऊ नयेत, शाळेकडून दबाव टाकण्यात येत असल्यास पालकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. मराठी शाळा बंद करण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप करत जमील देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घातला. महानगर अध्यक्ष विरेश पाटील, सलीम कुरेशी, भगतसिंग पाटील, संदीप मांडोळे, डॉ. शेख, प्रकाश झोपे, जितेंद्र करोसिया, हे पदाधिकारी उपस्थित होते.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा