महापौर कला ओझा यांच्या प्रभाग ७० मध्ये पाणीपुरवठा अधिकारी सातत्याने दुर्लक्ष करून नागरिकांना वेठीत धरत आहेत. महापौर ओझा यांच्याशी नागरिकांनी संपर्क साधला असता त्या समाधानकारक उत्तर देत नाहीत. नागरिकांना वेठीस धरून पिण्याच्या पाण्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप करून मनसेतर्फे या प्रश्नी आंदोलन करण्यात आले.
महापौरांच्या प्रभागात सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता मनसेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. प्रभागातील नागरिकांना पाणी द्या नाही तर खुर्ची खाली करा अशा घोषणा देत महापौर व महापालिकेचा या वेळी निषेध करण्यात आला. प्रभागातील नागरिकांना पाणीपुरवठा न झाल्यास मनसेतर्फे महापालिकेत काम बंद आंदोलन हाती घेण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनात मनसेचे शहराध्यक्ष डॉ. शिवाजी कान्हेरे, अजय गटाणे, रवी गायकवाड, अ‍ॅड. नूतन जैस्वाल, लीला देशमुख, डॉ. सुनीता साळुंके, कृष्णा सातपुते आदी कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.

Story img Loader