महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीरसभेच्या नियोजनात स्थानिक नेत्यांची चांगलीच दमछाक होत असून आठवडय़ापूर्वी झालेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जंगी सभेनंतर राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी खेचण्याचे आव्हान या नेत्यांसमोर आहे. येथील सायन्सकोअर मैदानावर येत्या २४ मार्चला राज ठाकरे यांच्या जाहीरसभेचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भातील ही त्यांची एकमेव जाहीरसभा असल्याने या सभेत ते काय भूमिका मांडतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
त्यातच उद्धव ठाकरे यांच्या सायन्स कोअर मैदानावरील जाहीर सभेतील गर्दीची तुलना होणार असल्याने आयोजकांवरील दडपण वाढले आहे. गेल्या काही दिवसांत राजकीय वातावरण झपाटय़ाने बदलले आहे. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी घेतलेली भेट, जशात तसे उत्तर देण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाहनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतलेली माघार, उद्धव ठाकरे यांची नवीन भूमिका, भाजप नेत्यांचे मत, या विषयांवर आणि राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे अमरावतीच्या सभेत काय भाष्य करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.
राज ठाकरे यांनी अमरावतीच्या सभेत सिंचनाच्या प्रश्नावर बोलू, असे संकेत आधीच दिले आहेत. या मुद्यावर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आधीच लक्ष्य केले आहे. भाजपचे काही नेतेही राज ठाकरे यांच्या ‘टप्प्यात’ आहेत. आता नवीन सावज कोण असेल, याची उत्सूकता राजकीय वर्तुळात आहे.
राज ठाकरे सहा वर्षांनंतर प्रथमच अमरावतीत येत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अमरावती जिल्ह्य़ाच्या राजकारणात अपेक्षित स्थान मिळालेले नाही. मनसेच्या स्थापनेनंतर अमरावती जिल्ह्य़ात शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांपैकी तत्कालीन नगरसेवक पप्पू पाटील मनसेचे जिल्हा संघटक आहेत.
 शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी अलीकडेच मनसेत प्रवेश केला आहे. इतर पदाधिकारी तुलनेत नवखे आहेत. शिवसेनेला एकेकाळी भरभरून साथ देणाऱ्या अमरावती जिल्ह्य़ात मनसेची शक्ती आजमावण्याची महत्वाकांक्षा या सभेच्या निमित्ताने स्पष्ट झाली आहे. राज ठाकरे यांच्या सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. पप्पू पाटील, ज्ञानेश्वर धाने पाटील यांच्यासह जिल्हाप्रमुखद्वय प्रदीप येवले, प्रवीण तायडे, अतूल देशमुख, प्रवीण डांगे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सभेच्या तयारीत व्यस्त आहेत. शहरातील मुख्य चौकांमधून मोठय़ा होर्डिग्जद्वारे सभेची जाहिरात केली जात आहे. या जाहिरातींमधून वातावरणनिर्मिती करण्यात मनसेला यश आले आहे.

Story img Loader