क्रीडा संकुलाच्या वास्तूला कोणत्याही राजकीय नेत्याचे नाव न देता क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या नागपुरातील वा विदर्भातील खेळाडूचे किंवा क्रीडा प्रशिक्षकाचे नाव द्यावे, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागीय संघटक हेमंत गडकरी यांनी केली आहे.
वर्धा मार्गावरील प्रभाक क्रमांक ५८ अंतर्गत येणाऱ्या विकासनगर स्थित नव्याने निर्माण झालेल्या क्रीडा संकुलाच्या नामकरणाबाबत चर्चा सुरू आहे. नागपूर महापालिकेची येत्या १८ जुलैला सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेत क्रीडा संकुलाच्या नामकरणाबाबत चर्चा होणार असल्यास त्यास खेळाडूचे नाव द्यावे, असे गडकरींनी म्हटले आहे. नागपुरातील  काही पक्षांतर्फे संकुलास बाळासाहेब ठाकरे तसेच दिवंगत आमदार गंगाधर फडणवीस यांचे नाव सुचवले आहे. ठाकरे आणि फडणवीस हे दोन्हीही मोठी नावे आहेत तसेच समाजाप्रती त्यांचे योगदानही मोठे आहे. गंगाधर फडणवीस यांचे श्रद्धानंद पेठ ते गांधीनगर चौकामधील मार्गाला नाव देण्यात आले आहे. मात्र क्रीडा संकुलासारख्या वास्तूला राजकीय नेत्याचे नाव न देता खेळाडू किंवा प्रशिक्षकाचे नाव दिले जावे.
महापालिकेच्यावतीने क्रीडा संकुलाची वास्तू उभारण्यात येणार आहे. अनेक चौकांना व रस्त्यांना वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे नाव देण्यात आले आहे. क्रीडा नैपुण्याने नागपूर नगरीचे नाव उंचावणाऱ्या क्रीडापटूंची नावे फार तुरळक ठिकाणी आहेत. त्यांचे नाव क्रीडा संकुलास दिल्यास समाजामध्ये क्रीडा विश्वाविषयी एक चांगला संदेश जाण्यास मदत होईल. संकुलाला क्रीडापटूनचे नाव देऊन महापालिकेने एक चांगला पायंडा या मागणीसाठी मनसेने हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील सहआयुक्त हेमंत पवार यांना निवेदन दिले. यासंदर्भात महापालिका अधिकारी व पक्षांचे नगरसेवक यांची हेमंत गडकरींनी भेट घेतली. त्यांच्यासोबत अजय ढोके, प्रशांत निकम, घनशाम निखाडे, प्रसाद मुजुमदार, निकेश भोले, सतीश नेवारी आणि इतर उपस्थित होते.

Story img Loader