गोदावरी कालव्यांचे हक्काचे ११ टीएमसी पाणी परत मिळावे तसेच अनेक वर्षांपासून रखडलेल्या कोल्हार ते कोपरगाव या महामार्गाचे काम त्वरित सुरू करावे, या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी भरपावसात नगर-मनमाड रस्त्यावर शिवाजी चौकात तासभर रस्ता रोको आंदोलन केले.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय काळे यांच्या नेतृत्वाखाली तालुकाप्रमुख राजेश लुटे, नाना बावके, उपतालुकाप्रमुख विजय मोगले, दत्तू कोते आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.
या वेळी नाना बावके म्हणाले, शेतक-यांच्या हक्काचे पाणी जलसंपदा विभागाने खासगी कंपन्यांना विकल्याने गोदावरीच्या लाभक्षेत्रात मानवनिर्मित दुष्काळ निर्माण झाला आहे. गोदावरी उजवा व डावा कालवा लाभक्षेत्रातील पिके जळत असताना नदी मात्र दुथडी भरून वाहात आहे.
विजय मोगले यांनी रखडलेल्या कोल्हार-कोपरगाव महामार्गाच्या कामाचे वाभाडे काढत महामार्गावर होणारे अपघात व वाहतुकीची होणारी कोंडी याला राष्ट्रवादीचे मंत्री जबाबदार असल्याचा आरोप केला. राष्ट्रवादी आणि कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या वादामुळे या मार्गाची दुर्दशा झाली असून दुरुस्तीच्या नावाखाली अधिकारी लाखो रुपयांची उधळपट्टी करून स्वत:चे खिसे भरण्यात मग्न आहेत असे ते म्हणाले.
रास्ता रोको आंदोलनामुळे राज्यमार्गावरील वाहतूक खंडित झाली होती. नायब तहसीलदार राहुल कोताडे यांनी आंदोलन निवेदन स्वीकारले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Story img Loader