राज्यभरातील टोलविरोधात जोरदार आवाज उठवत येत्या बुधवारी ‘रास्ता रोको’ आंदोलनाची घोषणा राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत केली. ठाकरे यांच्या घोषणेनंतर मुंबईकरांच्या आणि विशेषत: मुंबईच्या टोलनाक्यांच्या परिसरात, मुंबईच्या हद्दीलगत आतबाहेर राहणाऱ्यांच्या मनात पहिला विचार आला तो बुधवारी कार्यालयात कसे पोहोचायचे हा. स्वाभाविकच पोलिसांचेही काम या घोषणेने चांगलेच वाढवले. या आंदोलनातून टोलबंदी साध्य होईल का यापेक्षाही चाकरमानी, महिला, विद्यार्थी आदींना काळजी लागली आहे बुधवारी इच्छित स्थळी वेळेवर कसे पोहोचता येईल याचीच!
राज्यभरात टोलविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘रस्ता रोको’ची हाक दिल्यानंतर मुंबईच्या आसपास राहणाऱ्यांसमोर मोठीच चिंता निर्माण झाली आहे. टोलविरोधात कितीही संताप असला, तरी बुधवारी आपले कार्यालय गाठण्यासाठी दर दिवशीपेक्षा अधिक मोठय़ा दिव्यातून जावे लागणार असल्याची काळजी मुंबईच्या आसपास राहणाऱ्यांच्या मनात दाटली आहे. या दिवशी हजारो मनसैनिक रस्त्यावर उतरून टोलनाक्यांवर ‘रास्ता रोको’ करणार असल्याने लोकलच्या गर्दीत धक्के खात ऑफिसला पोहोचण्याशिवाय दुसरा पर्याय लोकांसमोर नाही. मात्र रेल्वे या दिवशी एकही जादा फेरी वाढवण्याच्या विचारात सध्या तरी नाही. त्यामुळे मुंबईकरांसाठी बुधवार धक्काबुक्कीचा वार ठरणार आहे.
१२ फेब्रुवारीच्या आंदोलनाचे नेतृत्व राज ठाकरे स्वत: करणार असल्याने मुंबईत हे आंदोलन चांगलेच गाजण्याची चिन्हे आहेत. सक्तीच्या टोलवसुलीबद्दल लोकांमध्ये कितीही संताप असला, तरी मुंबईकडे जाणारे रस्तेच बंद झाले, तर कामावर पोहोचायचे कसे, हा प्रश्न ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर येथून मुंबईत गाडीने कामावर येणाऱ्यांना पडला आहे.
ठाणे, नवी मुंबई येथून अनेक जण बेस्टने मुंबईत येतात. मात्र टोलनाक्यांवर बुधवारी होणाऱ्या ‘रास्ता रोको’मुळे या गाडय़ांवरही परिणाम होणार आहे. या परिस्थितीत काय करायचे, हा प्रश्न बेस्टपुढेही पडला आहे. या दिवशी काही गाडय़ांचे प्रवर्तन मुंबईच्या हद्दीपर्यंतच मर्यादित ठेवायचे वा नाही, याबाबतचा विचारही चालू आहे. मात्र बेस्टला या परिस्थितीत जास्त काही करता येण्यासारखे नाही, असे बेस्टचे जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोफणे यांनी सांगितले.
खासगी गाडय़ांतून किंवा बेस्टने मुंबई गाठणारे अनेक प्रवासी बुधवारी रस्त्याऐवजी लोकलच्या वाटय़ाला जाण्याची शक्यता आहे. आधीच लोकल ट्रेनमध्ये लोंबकळत जाणाऱ्या लाखो प्रवाशांच्या संख्येत आणखी काही हजार प्रवाशांची वाढ या दिवशी पडेल. मात्र या गर्दीला सामावून घेण्यासाठी मध्य रेल्वे कोणत्याही विशेष गाडय़ा सोडण्याची शक्यता नाही. मध्य रेल्वेच्या १६१८ फेऱ्यांद्वारेच पूर्व उपनगरे, ठाणे, कल्याण, नवी मुंबई येथून लोकांना कार्यालय गाठावे लागणार आहे. त्यामुळे या दिवशी प्रवास करताना प्रवाशांचा जीव मेटाकुटीला येणार एवढे नक्की.
उद्या हाल नक्की!
* रेल्वेच्या फेऱ्या आहेत तेवढय़ाच *‘बेस्ट’लाही आंदोलनाच्या फटक्याची भीती
First published on: 11-02-2014 at 06:28 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns rasta roko may affect bus travelling