निवडणुका तोंडावर आल्यावरच काही पक्षांना महापुरूषांची आठवण होते अशा शब्दात टीका करून शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिवजयंतीची मिरवणूक सकाळी १० वाजता काढण्याबाबत परवानगी मागण्याचा समाचार घेतला.
तिथीनुसार ३० मार्चला येणारी शिवजयंती शिवसेना व मनसेच्या वतीने साजरी करण्यात येते. दोन्ही पक्षांत राजकीय वैमनस्य आहे. त्यामुळेच शिवजयंतीपूर्वीच दोघांकडून आरोपप्रत्यारोपाची धुळवड उडू लागली आहे. मनसेच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सकाळी १० वाजता मिरवणुकीची परवानगी मागणारा अर्ज करण्यात आला. तो करताना मिरवणुकीस शिवसेनेमुळे विलंब होत असल्याचे कारण देण्यात आले. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला.
संभाजी कदम यांनी तो मनसेवर उलट टिका करून व्यक्त केला. शिवजयंतीच्या मिरवणुकीसाठी परवानगी मागणारे पत्र २८ फेब्रुवारीलाच पोलीस अधीक्षकांना दिले आहे. त्यात दुपारी २ वाजता शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिषेक करून मिरवणूक सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या मिरवणुकीत शिवजीवनावरील देखावे, वाद्य तसेच लेझीम पथके असतात. अनेकांचा त्यात सहभाग असतो, त्यामुळे मिरवणुकीची वेळ लांबणे स्वाभाविक आहे.
त्यासाठीच ध्वनीक्षेपकाला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी द्यावी असेही पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहे. शिवसेनेसह अनेकांचा सहभाग असलेल्या व दुपारी २ वाजता निघणाऱ्या या मिरवणुकीपेक्षा मोठी मिरवणूक मनसे काढणार असेल तर खरोखरच त्यांना सकाळी १० वाजताच परवानगी द्यावी म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये वाद होणार नाहीत, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील अशी उपरोधिक सुचना करणारे पत्रही कदम यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना मंगळवारी दिले.

Story img Loader