आगामी २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भात विविध राजकीय पक्षांनी संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले असून आता मनसेही सक्रिय झाली आहे. येत्या २२ जानेवारीपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे सर्व आमदार आणि प्रमुख पदाधिकारी विदर्भाचे प्रश्न घेऊन मैदानात उतरणार आहेत.आमदारांच्या दौऱ्यानंतर १५ मार्चला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नागपुरात येणार असून त्यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्याच्या निवडणुकींमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फारसे यश मिळाले नव्हते. विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फारसे अस्तित्व आणि कार्यकर्त्यांचे संघटन नसताना गेल्या चार वर्षांपासून विदर्भातील कार्यकर्त्यांनी पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहे आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मनसेला विदर्भात केवळ यवतमाळ जिल्हा परिषदेत यश मिळाले मात्र, उर्वरित विदर्भात फारसा प्रभाव पाडता आलेला नव्हता.त्यामुळे आगामी २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील विविध भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आणि कार्यकर्त्यांचे संघटन वाढविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार विदर्भातील विविध जिल्ह्य़ात दौरे करणार आहेत.  त्याचाच एक भाग म्हणून २३ आणि २४ जानेवारीला आमदार राम कदम, सरचिटणीस शिरीष सावंत आणि अतुल चांडक नागपूर आणि विदर्भाच्या दौऱ्यावर येणार असून ते दोन्ही जिल्ह्य़ात कार्यकर्त्यांच्या बैठकी घेणार आहे. त्याचवेळी २३ ते २५ जानेवारी दरम्यान आमदार प्रवीण दरेकर, नितीन भोसले आणि सरचिटणीस अतुल सरपोतदार चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्य़ात कार्यकर्त्यांच्या बैठकी घेतील. गोंदिया, गडचिरोली भागातील शेतक ऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे. पश्चिम विदर्भात अमरावती, अकोला. बुलढाणा, यवतमाळ, वाशीम या जिल्ह्य़ांत बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई आदी प्रमुख मनसे आमदार आणि पदाधिकारी येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विदर्भातील विविध जिल्ह्य़ातील आमदारांच्या दौऱ्यानंतर विदर्भातील प्रमुख पदाधिकारी आमदारांची मुंबईला विदर्भाच्या प्रश्नांवर बैठक होणार आहे. त्या बैठकीनंतर राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर येणार असल्याचे सांगण्यात आले. राज ठाकरे १० फेब्रुवारीपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून १५ मार्चला नागपुरात येतील. यावेळी ते कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सायंकाळी नागपुरात जाहीर सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विदर्भाची बकाल झालेली परिस्थिती व विदारक समस्या पाहिल्यावर विदर्भातील लोकप्रतिनिधी लायक नाहीत, असेच म्हणावे लागेल, अशी मुक्ताफळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार शिशिर शिंदे यांनी अकोल्यात पत्रकारांशी बोलताना उधळल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
विदर्भाची सर्वच क्षेत्रातील परिस्थिती बकाल झाली आहे. विदर्भातील रस्त्यांची खराब परिस्थिती, पाण्याचा आणि विजेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. विदर्भाची सर्वच क्षेत्रात झालेली राखरांगोळी पाहिल्यावर विदारक परिस्थिती डोळ्यासमोर येते. शेतकरी समस्या कायम आहे, कापसाला योग्य भाव नाही. या सर्व गोष्टींना येथील लोकप्रतिनिधी जबाबदार असून ते जनतेचे प्रतिनिधीत्व करण्यास लायक नसल्याची गंभीर  शिंदे यांनी केली. मनसेत चांगले कार्यकर्ते ग्रामीण व शहरी भागात आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यांच्यावर पक्ष निश्चित जबाबदारी टाकेल. राजकीय पक्षात बदल क्रमप्राप्त आहे. त्यामुळे पक्षात संघटनात्मक पातळीवर बदल निश्चित केले जातील, असे सुतोवाच त्यांनी केले. नवीन चेहऱ्यांना योग्य संधी पक्षात दिली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा