एकुणात मात्र सारे ढिम्मच!
येत्या काळातील पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन शहरासाठी मुळा धरणातील पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. सर्वसाधारण सभेत त्यावर चर्चाही झाली, मात्र काही निवडक नगरसेवक वगळता मनपा पदाधिकारी, तसेच प्रशासनही या समस्येवर अद्याप हलायला तयार नाही.
सर्वसाधारण सभेतील चर्चेत मनपाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मुळा धरणात शहरासाठी पाणीसाठा राखीव ठेवण्याचे निवेदन देण्याचा विषय झाला होता. मात्र नंतर त्यावर पुढे काहीही झाले नाही. त्यामुळे मनसेचे नगरसेवक गणेश भोसले व किशोर डागवाले यांनी पत्र देत प्रशासनाला त्याची आठवण करून दिली आहे. सरकारी धोरणानुसार पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य आहे. त्याचाच आधार घेत धरणातील पाण्यावर शहरासाठी आताच हक्क दाखवला नाही तर भीषण पाणी टंचाईला भविष्यात तोंड द्यावे लागेल असेही त्यांनी नमुद केले आहे. शहर पाणी पुरवठा योजना मुळा धरणावर अवलंबून आहे. २६ टीएमसी क्षमतेच्या या धरणात सध्या फक्त १३ टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यातून शेतीला एक आवर्तन देण्यात आले आहे. त्यामुळे फक्त १० टीएमसी पाणी शिल्लक राहील. बाष्पीभवन तसेच अन्य गावांना देण्यात येणारे पाणी लक्षात घेता ऐन उन्हाळ्यात धरणात फक्त मृतपाणीसाठाच राहण्याची दाट शक्यता आहे. नगरचा पाणी पुरवठा व्यवस्थित रहायचा असेल तर धरणातील पाणी पातळी किमान १ हजार ७५२ फूट असणे गरजेचे आहे. सध्या ही पातळी १ हजार ८७८ फूट आहे. म्हणून आताच धरणातील पाणी शहरासाठी राखीव ठेवण्याची मागणी केली पाहिजे, असे भोसले व डागवाले यांनी म्हटले आहे.