राज ठाकरेंसाठी पाच तास प्रतीक्षा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नगरमधील त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्यांना व निदर्शकांनाही बरीच प्रतीक्षा करायला लावली. दुपारी ४ वाजता नगरमध्ये येणारे ठाकरे रात्री उशीरा नगरमध्ये आले.
ठाकरे यांचा आज नगरमध्ये मुक्काम असून त्यांच्या उपस्थितीत शहरातील काही राजकीय व्यक्तींचा मनसेत प्रवेश व्हावा म्हणून जोरदार प्रयत्न होत आहेत. मनसेचे येथील नगरसेवक किशोर डागवाले तसेच गणेश भोसले यांच्या माध्यमातून हे प्रयत्न होत आहेत. भारतीय जनता पक्षातील काही जुन्या पदाधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा यात आहे.  बीडहून भगवानगडावरच (पाथर्डी) त्यांचे उशीरा आगमन झाले. तेथील कार्यक्रम संपवून ते दुपारी ४ वाजता नगरमध्ये येणार होते. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी मनसेचे कार्यकर्ते करत होते तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात ठाकरे यांनी केलेल्या टिकेचा निषेध म्हणून काळ्या झेडय़ांनी त्यांच्यासमोर निदर्शने करण्याची तयारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते करत होते.
ठाकरे यांचा प्रवेश भिंगारमधून नगरमध्ये होणार होता. त्यामुळे दुपारी ३ वाजल्यापासूनच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते भिंगार सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर जमा झाले. ठाकरे समर्थक कार्यकर्ते तोपर्यंत जागे झाले नव्हते, मात्र निदर्शकांची गर्दी वाढल्यानंतर येथे मनसेचेही कार्यकर्ते मोठय़ा संख्येने जमा झाले. त्यांनी स्वागतासाठी भिंगार वेशीजवळची जागा निवडली.
मात्र अशी जय्यत तयारी होऊनही ठाकरे यांचे आगमन होत नसल्याने स्वागतार्थी व निदर्शक असे दोघेही त्रस्त झाले होते. दुपारी ३ वाजेपर्यंत तर ठाकरे भगवानगडावरच आलेले नव्हते. त्यामुळे त्यांचे पुढचे सगळे कार्यक्रम लांबणार हे नक्की झाले. दुपारी साडेचारच्या नंतर ते गडावर आले. त्यानंतर तिथून दर्शन वगैरे घेऊन नगरला निघायला त्यांना उशीर झाला. रात्री नऊनंतर ते नगरला आले. वाटेत ठिकठिाकाणी त्यांचे स्वागत करण्यात येत होते. आज सरकारी विश्रामगृहावर त्यांचा मुक्काम आहे. उद्या (बुधवार) सायंकाळी ते येथून औरंगाबादला रवाना होतील.