फुकट बिअर दिली नाही म्हणून बिअर शॉपीचालकाला मारहाण करून बिअरच्या बाटल्या व तीन हजारांची रोकड लुटून नेल्याप्रकरणी मनसेच्या उत्तर सोलापूर तालुकाप्रमुख जैनोद्दीन शेख यास पोलिसांनी अटक करून एक दिवसाची पोलीस कोठडी घेतली.
मनसेचे तालुकाप्रमुख जैनोद्दीन शेख (वय ३५, रा. देगाव, सोलापूर) यांनी रात्री मरिआई चौकातील आकाश बिअर शॉपी या दुकानात येऊन दोन बिअरच्या बाटल्यांची मागणी केली. दुकानचालक राजेश मदले यांनी फ्रिजमधून दोन बिअरच्या बाटल्या काढून काउंटरवर ठेवल्या व बिलापोटी दोनशे रुपये मागितले. परंतु शेख यांनी, मला ओळखत नाही काय, पैसे मागतोस काय, असे म्हणत शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर शेख यांनी बिअरच्या दोन बाटल्या व दुकानातील काउंटरमध्ये हात घालून तीन हजारांची रोकड बळजबरीने काढून घेतली. नंतर ते पसार झाले. या प्रकरणी राजेश मदले यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली असून त्यानुसार शेख यास अटक करण्यात आली आहे.
 

Story img Loader