तालुक्यापासून जिल्हय़ापर्यंतच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेले वाद, गटबाजी यामुळे राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या सात वर्षांत या जिल्हय़ात बाळसेच धरू शकली नाही. येथील उद्योगात रोजगाराच्या नावावर परप्रांतीयांचा भरणा होत असतानासुद्धा या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कायम मौनच बाळगले.
 पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या राज्यभर दौरा करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांच्या विदर्भ दौऱ्याची सुरुवात या जिल्हय़ापासून होत आहे. आज त्यांचे येथे आगमन झाले. उद्या दिवसभर ते चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्हय़ातील संघटनात्मक स्थितीचा आढावा घेणार आहेत. या पाश्र्वभूमीवर सात वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या या पक्षाची या जिल्हय़ातील संघटनात्मक ताकत कधीच वाढलेली दिसली नाही हे ठळकपणे दिसून येते. मनसेने संपूर्ण राज्यात प्रत्येक जिल्हय़ात संघटक पदाला महत्त्व दिले. येथे राजेश महातव यांची नेमणूक झाली होती. तीन वर्षांपूर्वी त्यांना पदावरून काढल्यानंतर अद्याप पक्षाला या पदावर माणूस नेमता आला नाही. जिल्हय़ाची सूत्रे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार यांच्याकडे आहे. या सात वर्षांच्या काळात एकही मोठे आंदोलन त्यांच्या नावावर नाही. संपूर्ण कार्यकारिणीसुद्धा त्यांना या काळात घोषित करता आली नाही. ठराविक अंतराने एकेका पदाधिकाऱ्याची नेमणूक करायची आणि वाद निर्माण झाला की माघार घ्यायची अशीच अवस्था या पक्षाची आजवर राहिली आहे. जिल्हय़ातील बहुतांश पदाधिकाऱ्यांचे एकमेकांशी पटत नाही. पक्षाची संघटनात्मक ताकत वाढविण्याऐवजी हे पदाधिकारी गटबाजी करण्यात नेहमी व्यस्त असतात. रामेडवार यांच्या विरुद्धच्या गटात राजू अल्लेवार, महातव यांचा समावेश आहे. या विरोधकांना पक्षाबाहेर कसे काढता येईल यातच विद्यमान पदाधिकारी व्यस्त असतात. आठ महिन्यापूर्वी या जिल्हय़ात कार्यकारिणीवरून मोठा वाद झाला होता. तेव्हा मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांना मध्यस्थी करावी लागली होती. त्यानंतरही वाद शमलेला नाही. महापालिकेच्या निवडणुकीत बंडखोरी करून पक्षाच्या उमेदवारांचा पराभव करणाऱ्यांना पदावर नेमणे, खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल असलेल्यांना विद्यार्थी सेनेचे प्रमुख पद देणे असे प्रकार या जिल्हय़ात सर्रास सुरू आहेत.
मध्यंतरी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवला होता. तेथील प्राचार्याच्या विरोधात आंदोलन केले होते. या प्रकरणात गुन्हे दाखल होताच कार्यकर्त्यांना मदत करण्याऐवजी पक्षाच्या जिल्हा प्रमुखांनी पोलीस ठाण्यात जाऊन या आंदोलनाशी पक्षाचा संबंध नाही असे जाहीर केले होते. विद्यार्थ्यांच्या या प्रकरणात नंतर प्राचार्याची बदली झाली, विद्यार्थ्यांना सुद्धा न्याय मिळाला. मनसे मात्र भांडण सुरू झाले. हा जिल्हा उद्योगांचा म्हणून ओळखला जातो. येथील उद्योगात काम करणारे बहुतांश कामगार परप्रांतीय आहेत. स्थानिकांना, विशेषत: मराठी तरुणांना रोजगार मिळावा ही मनसेची मुख्य भूमिका असतानासुद्धा स्थानिक पदाधिकारी या उद्योगांविरुद्ध कधीच आवाज उठवत नाहीत. या मुद्यावर आजवर एकही आंदोलन पदाधिकाऱ्यांनी केले नाही. पक्षाची स्थापना केल्यानंतर या जिल्हय़ाच्या दौऱ्यावर आले असताना खुद्द राज ठाकरे यांनी वरोरातील वर्धा पॉवर कंपनीत चिनी कामगार काम करीत असल्याचा आरोप केला होता. त्यांच्यापासूनही स्थानिक पदाधिकारी बोध घेण्यास तयार नसल्याचे आजवर दिसून आले आहे. या पाश्र्वभूमीवर आता ठाकरे उद्या शनिवारी कशी झाडाझडती घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा