विधी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुणांच्या जवळपास गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना ‘ग्रेस’ गुणांचा लाभ देण्याची, मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पुणे विद्यापीटाच्या कुलगुरूंकडे केली आहे.
मनविसेच्या वतीने विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समस्यांविषयी कुलगुरूंना निवेदन दिले  असून विद्यापीठाच्या  पेपर तपासणीतील गोंधळाचीही तक्रार केली आहे. विद्यापीठाव्दारे विविध विषयातील प्रश्नांचे अपेक्षित उत्तर पुस्तक स्वरुपात प्रकाशित करण्यात यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना अपेक्षित उत्तर देणे सोपे होईल, पुन: तपासणीसाठी पाठविलेल्या उत्तरपत्रिकांच्या गुणांमध्ये अपेक्षेप्रमाणे बदल होत नसल्याच्या तक्रारी आहेत. एका विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्षांत प्रवेश देण्यात यावा, विधी विषयाशी संबंधित नसलेल्या विषयांना अभ्यासक्रमातून वगळण्यात यावे, परीक्षेदरम्यान दोन विषयांच्या पेपरमध्ये कमीतकमी एक दिवसाचे अंतर ठेवावे, प्रश्नपत्रिकेत वस्तूनिष्ठ प्रश्नांचा समावेश असावा या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. राज्यातील विधी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या या समस्यांची त्वरीत दखल घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. यावेळी मनविसेचे शहर उपाध्यक्ष अजिंक्य गिते, बबन धोंगडे, जय कोतवाल, नितीन निगळ आदी उपस्थित होते.

Story img Loader