देशातील पहिल्या मोबाईल बँकिंगव्दारा बँकेच्या सेवा ग्रामीण भागातील नागरिकांच्या दारापर्यंत जाऊन पोहोचणार आहेत. ही बँकिंग क्षेत्रातील क्रांतिकारी वाटचाल आहे. ही सेवा पुरविणाऱ्या आयसीआयसीआय बँकेने आधारकार्ड नोंदणीचे मशीन मोबाईल बँकिंगमध्ये ठेवून आधारकार्ड जनतेपर्यंत पोहोचविण्याची भूमिका पार पाडावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी येथे बोलताना व्यक्त केली.    
आयसीआयसीआय या भारतातील सर्वात मोठय़ा खासगी बँकेने बँकिंग सुविधांपासून वंचित असलेल्या भागात बँकिंग सुविधा पुरविण्याच्या हेतून आखलेल्या आर्थिक समावेशकता योजनेचा भाग म्हणून ‘ब्रँच ऑन व्हील्स’ (मोबाईल बँकींग) सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. देशात सर्वप्रथम या सेवेचा प्रारंभ येथे मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते वैष्णवी गणपती इंगळे, प्राजक्ता चंद्रकांत वाळवेकर, सोनाली सदाशिव नाईक व मिलन भिमराव कुंभार या ८० टक्क्य़ांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींना १ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.    
आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक राजीव सभरवाल या उपक्रमाची माहिती देताना म्हणाले, ब्रँच ऑन व्हील ही एटीएम सहीत असलेली मोबाईल शाखा असून ती बचत खाते, कर्जे, रोख रक्कम भरणे वा काढणे, खात्यातील बॅलन्सविषयी माहिती, स्टेटमेंट प्रिटिंग व निधी हस्तांतर, डीडी, पीओ कलेक्शन आदी मूलभूत बँकिंग सेवा व उत्पादने देते. कार्यक्रमास पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी राजाराम माने, महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, माजी आमदार पी.एन.पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, अॅड.सुरेश कु-हाडे उपस्थित होते.

Story img Loader