मोबाइल कंपन्या विविध सेवांच्या नावाखाली सर्वसामान्य ग्राहकांची लुबाडणूक करीत असल्याची तक्रार शहर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते उल्हास सातभाई यांनी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)चे सल्लागार मदन मोहन यांच्याकडे केली आहे.
ट्रायच्या कामकाजाची ग्राहकांना माहिती देण्यासाठी तसेच ग्राहकांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी ट्रायचे सल्लागार मदन मोहन यांच्या उपस्थितीत येथील दूरसंचार कार्यालयात आयोजित बैठकीत सातभाई यांनी ही तक्रार केली. मोबाइल कंपन्या विविध सेवांच्या नावाखाली ग्राहकांची आर्थिक लूट करीत आहेत. मूल्यवर्धित सेवा ग्राहकांच्या संमतीशिवाय सुरू करून त्यांचे शुल्क ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रकार करण्यात येत आहे. ग्राहकांना न विचारता या सेवांचा मोबदला त्याच्या खिशातून काढून घेण्यात येत आहे. जागरूक ग्राहकांनी सदर कंपनीच्या ग्राहक तक्रार केंद्राकडे तक्रार केल्यास ‘सव्र्हर डाऊन’ असल्याचे ठरावीक साचेबंद उत्तर देऊन ग्राहकांची बोळवण करण्याकडे या केंद्रातील कर्मचाऱ्यांचा कल असल्याचा उद्वेगही सातभाई यांनी व्यक्त केला. एखाद्या ग्राहकाने चिकाटी न सोडल्यास त्याचे म्हणणे एकून न घेता दूरध्वनी बंद करण्याचा उद्दामपणा या कंपन्या करीत आहेत. याबाबत दाद कोणाकडे मागावी, याची माहिती सामान्य ग्राहकांना नसल्यामुळे या कंपन्यांचे फावले असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘फुल टॉकटाइम मेसेज’ पाठवून ग्राहकांना लुबाडण्याचे प्रकारही वाढले आहेत. असे संदेश पाहून ग्राहकाने रिचार्ज केल्यानंतर ग्राहकाला फसवणूक झाल्याचे लक्षात येते. त्यांनी तक्रार केल्यास विविध अटींमध्ये त्यांना गुरफटून टाकण्यात येते. ग्राहकाला फुल टॉकटाइमचा वा इतर प्रलोभनांचा संदेश पाठविताना त्याबाबतच्या अटींचीही पूर्वकल्पना या संदेशात देण्याची मागणीही सातभाई यांनी केली.
बीएसएनएलच्या दूरध्वनी अदालतच्या धर्तीवर या खासगी मोबाइल कंपन्यांना वर्षांतून एकदा जिल्ह्य़ाच्या ठिकाणी ग्राहक मेळावा आयोजित करण्याची कायद्याने सक्ती करावी. अशा मेळाव्याला ट्रायच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य असावी, अशी सूचनाही सातभाई यांनी केली. जिल्हा निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष रमेश पवार तसेच केबल संघटनेचे पदाधिकारी शिवा देशमुख यांच्यासह विविध ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्या मदन मोहन यांच्याकडे मांडल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा