महापालिकेचा थकित मिळकत कर वसूल करण्यासाठी धडक कारवाई सुरू करण्यात आली असून चार मोबाईल कंपन्यांच्या कार्यालयांवर बुधवारी कारवाई करण्यात आली. त्यामुळे सुमारे दोनशे टॉवरचे काम बुधवारी बंद पडले. या मोबाईल कंपन्यांकडे मिळकत कराची दहा कोटींची थकबाकी असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
महापालिकेचे मिळकत कर विभाग प्रमुख, उपायुक्त हेमंत निकम यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई सुरू झाली असून थकित कराच्या वसुलीसाठी मोबाईल कंपन्यांवर यापूर्वीच कारवाई करण्यात येणार होती. ती कारवाई बुधवारपासून सुरू करण्यात आली. शहरातील अनेक मिळकतींवर मोबाईल कंपन्यांनी त्यांचे टॉवर उभारले असून त्यांनी संबंधित मिळकतीचा कर भरणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, मोबाईल कंपन्यांनी मिळकत कराचे दहा कोटी रुपये थकवले आहेत. या थकबाकीच्या वसुलीसाठी कारवाई सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
रिलायन्स, व्होडाफोन, इंडस टॉवर आणि टॉवर व्हीजन या चार कंपन्यांच्या कार्यालयांवर बुधवारी कारवाई करण्यात आली आणि या कंपन्यांची कार्यालये सील करण्यात आली. कल्याणीनगर आणि मगरपट्टा येथे ही कारवाई केल्याचे निकम यांनी सांगितले. या कारवाईमुळे या कंपन्यांचे टॉवरमार्फत सुरू असलेले काम बंद पडले. थकबाकी असलेल्या इंडस या कंपनीने कारवाई सुरू होताच दोन कोटी रुपये जमा केल्याचेही निकम यांनी सांगितले. यापूर्वीही काही कंपन्यांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, एवढय़ा मोठय़ा प्रमाणात प्रथमच कारवाई करण्यात आली आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा