प्रवाशांना रेल्वे स्थानकावर जाऊन रांगेत उभे राहून रेल्वे प्रवास तिकीट आरक्षण करणे कष्टप्रद असल्याने रेल्वे प्रशासनानेच आता प्रवाशांच्या सेवेसाठी ‘मुश्किल आसान’ योजना हाती घेऊन फिरते आरक्षण केंद्र सुरू करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या घरासमोरच आरक्षण मिळण्याची सोय उपलब्ध होणार आहे. देशातील तिसरे फिरते आरक्षण केंद्र सोलापुरात सुरू करण्यास रेल्वे बोर्डाने हिरवा कंदील दाखविला आहे.
या फिरत्या आरक्षण केंद्रावर रोख रक्कम देऊन देशातील कोणत्याही रेल्वेगाडीचे आरक्षण करता येणार आहे. त्यासाठी एक स्वतंत्र वाहन व तीन कर्मचारी नियुक्त केले जात आहेत. सोलापूर विभागात असे हे पहिलेच फिरते आरक्षण केंद्र असेल. या फिरत्या आरक्षण केंद्राचे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. त्याची वेळ सकाळी ८ ते दुपारी ३ अशी राहणार आहे. मंगळवार व बुधवारी हे फिरते आरक्षण केंद्र तुळजापूर येथे राहणार आहे. पहिल्या दिवशी तुळजाभवानी मंदिराजवळ तर दुसऱ्या दिवशी तुळजापूरच्या शिवाजी चौकात या आरक्षण केंद्राची सेवा चालणार आहे. गुरूवार व शुक्रवारी अक्कलकोट येथे हे फिरते केंद्र राहणार आहे. पहिल्या दिवशी श्रीस्वामी समर्थ मंदिर परिसरात तर दुसऱ्या दिवशी अक्कलकोट एसटी बसस्थानकाजवळ त्याची सेवा चालणार आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील परिचालन व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी ही माहिती दिली.
तुळजापूर व अक्कलकोटनंतर उर्वरित तीन दिवस या फिरत्या रेल्वे आरक्षण केंद्राची सेवा सोलापुरात चालणार आहे. शनिवारी सकाळी ८ ते ११ पर्यंत होटगी रस्त्यावर आसरा चौकात, तर सकाळी ११.३० ते दुपारी ३ पर्यंत हे केंद्र होटगी रस्त्यावर विमानतळाजवळ राहणार आहे. रविवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत दयानंद महाविद्यालय व सकाळी ११.३० ते दुपारी ३ पर्यंत वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ ही सेवा कार्यान्वित राहणार आहे. सोमवारी सकाळी ८ ते ११ पर्यंत विजापूर रस्त्यावर भारती विद्यापीठाजवळ तर सकाळी ११.३० ते दुपारी ३ पर्यंत ही सेवा नवीन आरटीओ कार्यालयाजवळ उपलब्ध होणार आहे.

Story img Loader