येथील शाहू चौकात काल रात्री उशिरा सहारा मोबाइल शॉपी फोडणा-या संजय सिध्दाप्पा चव्हाण (वय २६, रा. विटा) या चोरटय़ास नागरिकांच्या प्रसंगावधानाने पकडण्यात पोलिसांना यश आले. संबंधित चोरटा सराईत आहे काय त्याची खात्री करण्याचे काम पोलीस करत आहेत. दरम्यान, कराडनजीकच्या ओगलेवाडीत पकडण्यात आलेला नगर जिल्ह्य़ातील संशयित अल्पवयीन असल्याने त्यास बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. त्यापूर्वी त्याने ओगलेवाडीत घरात चोरी केली होती. ते दागिने व रोख रक्कमही त्याच्याकडून हस्तगत झाली आहे. त्याच्या अन्य साथीदारांचाही शोध सुरू आहे.
येथील शाहू चौकात सहारा मोबाइल शॉपी आहे. ती काल मध्यरात्री चोरटा फोडत असल्याचे तेथील नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने तेथून जवळच असलेल्या पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार पोलिस तत्काळ दाखल झाले. त्यांनी दुकानातूनच संजय सिध्दाप्पा चव्हाण या चोरटय़ास ताब्यात घेतले. त्याच्याकडे कटावणीसह अन्य हत्यारे सापडली आहेत. त्याचे कोणी साथीदार आहेत काय, यासाठी पोलिसांनी त्वरित रात्र गस्तीला असलेल्या पोलिसांकडून नाकाबंदी करून घेतली. मात्र अन्य कोणीही त्यांना सापडले नाही. ओगलेवाडीत पकडलेल्या अल्पवयीन चोरटय़ाचे अन्य साथीदार कोण आहेत काय, याचाही कसून शोध जारी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा