सालेकसा तालुक्यातील भ्रमणध्वनींचे झाले खेळणे
गेल्या वर्षी पुकारलेल्या बंददरम्यान दहशत पसरविण्यासाठी नक्षलवाद्यांनी टोयागोंदी येथील ग्रामपंचायत इमारत व जमाकुडो येथील मोबाइल टॉवर जाळले होते. मात्र एक वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही येथील परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने सालेकसा तालुक्यातील दरेकसा व जमाकुडो परिसरातील नागरिकांचे भ्रमणध्वनी हाताचे खेळणे झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच नक्षलवाद्यांनी जमाकुडो येथे दुकानदाराची गोळी झाडून हत्या केली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या भागातील खुद्द पोलिसांनीही नक्षलवाद्यांचा चांगलाच धसका घेतल्याचे जाणवत आहे.
नक्षलवाद्यांनी गेल्या वर्षी १६ मे रोजी भारत बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार बंद यशस्वी करण्यासाठी नक्षलवाद्यांनी सालेकसा तालुक्यातील जमाकुडो येथील बीएसएनएल कंपनीचे मोबाइल टॉवर व टोयागोंदी येथील ग्रामपंचायत इमारतीला १५ मेच्या मध्यरात्रीदरम्यान आग लावली होती. आज या घटनेला एक वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला असला तरी येथील परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे धकाधकीच्या जीवनात जमाकुडो-दरेकसा परिसरातील नागरिकांना दूरध्वनीवर संपर्क साधणे अवघड झाले आहे. येथील नागरिकांना सालेकसा किंवा कावराबांध येथील मोबाइल टॉवरचा आसरा घेण्यासाठी उंच घरावर, झाडावर किंवा टेकडीचा आधार घ्यावा लागतो. काही अत्यावश्यक काम असले तरी मोबाइल हे हातातील खेळणे झाल्याने त्याचा उपयोग करता येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी असंतोष खदखदत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी जमाकुडो येथे पोलीस छावणीपासून अगदी हाकेच्या अंतरावर नक्षलवाद्यांनी दुकानदाराची गोळी झाडून हत्या केली. विशेषत: नक्षलवाद्यांच्या बीमोडासाठी या ठिकाणी नियुक्त केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्येही नक्षलवाद्यांविषयी दहशत असल्याचे जाणवत आहे. जमाकुडो येथील पोलीस छावणीतून सायंकाळी सहानंतर हे शिपाई सकाळ होईपर्यंत बाहेर ढुंकूनही पाहत नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे जर पोलीसच घाबरत असतील तर येथील सामान्य जनतेचे काय, असा प्रश्न येथील सामान्य जनतेला पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथील नागरिक भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहेत. नक्षलवादग्रस्त भागासाठी अनेक उपाययोजना राबविण्यात येत असल्या, तरी वर्ष लोटूनही जमाकुडो येथील टॉवर अजूनही उभारण्यात न आल्याने प्रशासनाविरोधात नागरिकांनी असंतोष व्यक्त केला आहे.