प्रवाशांच्या सोयीसाठी शहरात लवकरच फिरती आरक्षण व्हॅन सुरू करण्याचे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने ठरवले आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाची रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीची बैठक नुकतीच विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस.एल. वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. त्यांनी अध्यक्षीय भाषणात आमंत्रित सदस्यांचे स्वागत करून गेल्या वर्षांत विभागाने केलेली कामगिरी आणि प्रवाशांना दिलेल्या सुविधा यांची माहिती दिली. चालू आर्थिक वर्षांत एप्रिल ते नोव्हेंबर २०१२ या आठ महिन्यात विभागाला ३ कोटी ६ लाख तिकीटांच्या विक्रीतून १०२ कोटी रुपयांची, तर मालवाहतुकीतून १४३.०५ कोटी रुपयांची मिळकत झाली आहे. प्रवासी वाहतुकीतील मिळकत गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा ५.०६ टक्के, तर मालवाहतुकीतील मिळकत ३०.२७ टक्के अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
  प्रवाशांच्या सोयीसाठी या आर्थिक वर्षांत ‘मुश्किल आसान’ योजनेंतर्गत विभागातर्फे एक फिरती व्हॅन सुरू करण्यात येणार असून, ही गाडी शहरात ठिकठिकाणी जाऊन प्रवाशांना आरक्षित तिकीटे उपलब्ध करून देईल. अलीकडेच नागपूर विभागात ४४ स्थानांकरता जनसाधारण तिकीट बुकिंग सेवकांच्या नियुक्तीसाठी अर्ज मागवण्यात आले असून त्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वेस्थानकावर जाण्याऐवजी घराजवळच सर्वसामान्य अनारक्षित तिकीट काढणे शक्य होणार आहे.
बैठकीला उपस्थित असलेल्या उपभोक्ता सल्लागार समितीच्या सदस्यांनी त्यांच्या क्षेत्रातील प्रवासी सुविधा आणि रेल्वेशी जुळलेल्या व्यापाराशी संबंधित मुद्दे मांडले आणि त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
इतवारीहून हावडय़ाकरता नवी गाडी, शिवनाथ एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल, कामठी स्थानकावर विदर्भ एक्सप्रेसला थांबा, भंडारा रोड स्थानकावर बिलासपूर- पुणे एक्सप्रेसचा थांबा, रामटेक लोकल वेळापत्रकाबरहुकूम चालवणे, दुर्ग- छपरा एक्सप्रेसचा गोंदिया किंवा इतवारी स्थानकापर्यंत विस्तार करणे, सिकंदराबाद- दरभंगा एक्सप्रेसला नागभीड व चांदाफोर्ट स्थानकांवर थांबा देणे, गोंदिया- चांदाफोर्ट या मार्गावरील स्थानकांच्या फलाटांची उंची वाढवणे, टाटानगर पॅसेंजरमध्ये एसी थ्री टियरचा एक डबा जोडणे, महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये पँट्री कार लावणे यासह प्रवाशी सुविधांशी संबंधित इतर मुद्यांचा यात समावेश होता.

Story img Loader