धुळे-चाळीसगाव रेल्वेने ट्रॅक्टरला उडविले.. या वाक्यानेच शुक्रवारी सकाळी अनेकांनी पोलिसांची झोप उडविली. सर्व ती यंत्रणा वापरूनही नेमके काय, कसे झाले, हे कळेनासे झाले. अखेर संपूर्ण कुमक घटनास्थळी पोहोचली आणि त्यांना हायसे वाटले. तोवर धुळ्याहून निघालेले रेल्वेचे इंजिन चाळीसगावच्या दिशेने निघूनही गेले होते. रेल्वे मार्ग ओलांडताना घ्यावयाची दक्षता आणि ही दक्षता न घेतल्यास होणारे दुष्परिणाम यांची खरेतर ही रंगीत तालीम होती. तथापि, स्थानिकांना त्याबाबत माहिती नसल्याने वेगवेगळ्या अफवा पसरून पोलीस यंत्रणेची दमछाक झाली.
जामदा आणि राजमाने या दोन गावांच्या दरम्यान रेल्वेचे आठ क्रमांकाचे गेट आहे. या दरवाजामधून जाताना धुळ्याहून येणाऱ्या रेल्वेने एका ट्रँक्टरला उडविल्याची ही बातमी होती. सकाळी पावणे दहाच्या सुमारास झालेल्या अपघाताचे वृत्त काही मिनिटातच धुळे, जळगाव, नंदुरबार, भुसावळ व थेट नाशिकपर्यंत पोहोचले. यामुळे रेल्वेच्याही काही अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये धावपळ झाली. पण, अध्र्या-पाऊस तासातच अपघाताची खातरजमा झाली आणि हा अपघात म्हणजे लोहमार्ग ओलांडताना घ्यावयाच्या काळजीच्या प्रात्यक्षिकाचा एकभाग होता. रेल्वेच्या एका विभागाकडून धुळे-चाळीसगाव लोहमार्गावर ही रंगीत तालीम घेण्यात आली. स्थानिक ग्रामस्थांना त्याबाबत गंधवार्ता नसल्याने त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षास या अपघाताची माहिती दिली. पोलीस यंत्रणेने परिसरात संपर्क साधून अपघाताची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, अपेक्षित माहिती मिळत नसल्याने पोलीस कुमक थेट घटनास्थळी जाऊन धडकली. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतल्यानंतर या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला. न घडलेल्या अपघाताविषयी अनेक अफवा पसरल्या असताना रंगीत तालीम करून रेल्वे इंजिन पुढे मार्गस्थही झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा