केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने उद्योग क्षेत्रासाठी घेतलेल्या निर्णयांचा नाशिकलाही फायदा होणार असून नाशिकच्या औद्योगिक वसाहतीचा करमाफी व अनुदान प्रोत्साहन योजनेत समावेश झाल्याने उद्योग वाढीस चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या (निमा) पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स आणि ऑटोमोबाइल क्षेत्रांत नाशिकमध्ये क्रॉम्प्टन ग्रीव्हज्, एबीबी, स्नायडर, सिमेन्स, टीडीके इप्कॉस, ऋषभ इंस्ट्रय़ुमेंट्स, बॉश, ज्योती स्ट्रक्चर, शिवानंद इलेक्टॉनिक्स, मोटवाणी इंस्ट्रय़ुमेंट्स, थायसन कृप आदी मोठय़ा कंपन्यांसह ८०० ते १००० लघु व मध्यम दर्जाच्या कंपन्या कार्यरत आहेत. निमाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून नाशिक शहरातील उद्योगांची संख्या व क्षमता वाढावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवनवीन कंपन्या नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत येण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर, निमा पॉवर प्रदर्शन यांच्या माध्यमातून निमातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत.
केंद्राच्या मदतीने इलेक्ट्रिकल लॅब सुरू करण्यासाठीही सातत्याने निमाकडून प्रयत्न होत आहेत. केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी करमाफी व अनुदान प्रोत्साहन योजनेंतर्गत नाशिकचा समावेश करण्यात आल्याचे जाहीर केल्याने इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित उद्योगाचा विस्तार होण्यास मदत होणार असल्याचे निमाचे अध्यक्ष मनीष कोठारी, मानद सरचिटणीस मंगेश पाटणकर, ऊर्जा समितीचे अध्यक्ष मिलिंद राजपूत आदींनी म्हटले आहे.