व्यापाऱ्यांच्या हितासाठी देशाची आर्थिक राजधानी व महाराष्ट्राचे भूषण असलेली मुंबई गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी केला. राष्ट्रवादी त्यांचा प्रयत्न कधी यशस्वी होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले. मोदी लाटेवर स्वार झाल्यामुळे नागरिकांना पुढील पाच वर्षे काय त्रास भोगावा लागेल याची जाणीव करून देण्याच्या दृष्टिकोनातून पक्षाचा प्रचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी येथील राष्ट्रवादी भवनमध्ये राज्यातील विविध महिला पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. या वेळी चव्हाण यांनी १९६० साली मुंबई गुजरातमध्ये वळविण्याचा प्रयत्न झाल्याचा संदर्भ देऊन आताही तशाच हालचाली सुरू असल्याचे सांगितले. गुजरात पॅटर्नच्या भूलभुलय्यामुळे राज्यात झालेल्या विकास कामांवर पडदा पडला. शिवसेनेने अलीकडेच विकास आराखडा सादर केला, तर मनसे ‘ब्लू-प्रिंट’ तयार करत आहे. विकास आराखडा किंवा ‘ब्लू प्रिंट’ या शब्दच्छलात अडकण्यापेक्षा विकास कामे महत्त्वाची असल्याचा टोला त्यांनी लगावला. राजेशाही थाटात वावरणाऱ्यांनी विकासाची वल्गना करू नये, असेही त्यांनी सुनावले. आगामी निवडणुकांमध्ये कार्यक्षम तसेच निवडून येण्याची क्षमता असलेल्या महिला उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी सूचित केले.
प्रभारी प्रचारप्रमुख उषा दराडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने दाखविलेले ‘अच्छे दिन’चे स्वप्न प्रत्यक्षात न आल्याने जनतेचा भ्रमनिरास झाल्याचे सांगितले. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्र सरकारने महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर करावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. विधानसभा निवडणुकीत प्रभावी प्रचार कसा करता येईल, गुजरात पॅटर्न कसे फोल आहे, राष्ट्रवादीच्या कार्यकाळात झालेली विकास कामांची माहिती, सरकारच्या महिला व शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना व प्रकल्प यांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन दराडे यांनी केले. आगामी निवडणुकात प्रचारासाठी कडकलक्ष्मी, वासुदेव, गोंधळी यांच्यासह ‘सोशल मीडिया’चा जास्तीतजास्त वापर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
गुजरातमध्ये मुंबई नेण्याचा मोदींचा डाव
व्यापाऱ्यांच्या हितासाठी देशाची आर्थिक राजधानी व महाराष्ट्राचे भूषण असलेली मुंबई गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-08-2014 at 07:45 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi intention to shift mumbai in gujarat