मागील २५ वर्षांत शस्त्रसंधीचे सर्वात मोठे उल्लंघन पाकिस्तानने केले आहे. भारतीय सैन्यावर आणि सीमावर्ती भागातील नागरिकांवर गोळीबार होत असताना देशाच्या पंतप्रधानांनी दिल्लीत थांबून काश्मिरी जनतेला आधार देण्याची गरज आहे.
तथापि, तसे चित्र दिसत नसून राज्यातील भाजप नेत्यांमुळे पंतप्रधानांवर प्रचार करण्याची वेळ आल्याची टीका शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केली. येवला व निफाड येथे बुधवारी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आलेले राऊत येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिध्द झालेल्या अग्रलेखाच्या संदर्भाने उपस्थित झालेल्या प्रश्नावर राऊत यांनी राज्यातील भाजप नेत्यांवर अप्रत्यक्षपणे शरसंधान साधले. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांमुळे सीमेवरील कठीण परिस्थितीत पंतप्रधान इतका काळ प्रचारात गुंतून पडले आहे. खरेतर या स्थितीत भारतीय सैन्य तसेच काश्मिरी जनतेच्या मागे पंतप्रधानांनी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे. दिल्लीत थांबून सूत्रे हलविणे आवश्यक आहे. परंतु, तसे घडताना दिसत नाही, असे राऊत यांनी सांगितले.
राज्यात भाजपचे कोणतेही अस्तित्व नसताना शिवसेनेने त्यांच्याशी युती केली. प्रदीर्घ काळ टिकलेली ही युती का तुटली, याचे कारण जनतेला समजायला हवे. पंतप्रधान जाहीर सभांमधून महाराष्ट्र वेगळा केला जाणार नाही असे सांगत आहे. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा केला जाणार असल्याचे सांगत
आहेत. याप्रकारे भाजपने जनतेची दिशाभूल चालविली असल्याचे राऊत यांनी सांगितले. मुंबईचे महत्व कमी करण्यास तसेच महाराष्ट्राचे तुकडे करण्यास शिवसेनेचा सदैव विरोध
आहे.
ही बाब विदर्भ वेगळा करताना अडचणीची ठरेल हे लक्षात घेऊन भाजपने युती तोडल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. युती तोडण्याचा विडा घेऊन दिल्लीहून कोणीतरी आले होते, असे सांगत त्यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर नामोल्लेख न करता ठपका ठेवला.
प्रचारादरम्यान सर्वपक्ष केवळ नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य करत असल्याच्या प्रश्नावर राऊत यांनी त्यास नकार दिला. शिवसेनेचे मिशन १८० ते २०० आहे. यामुळे विधानसभा निवडणूक ही सेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे विरुध्द सर्वपक्षीय अशी होत असल्याचा दावा केला. निकालानंतर राज्यात शिवसेना क्रमांक एकचा पक्ष म्हणून पुढे येईल. दिल्लीतील अफजलखानाची फौज महाराष्ट्रावर चालून आल्याच्या विधानाविषयी राऊत यांनी ही वैयक्तिक स्वरुपाची टिका नव्हती असे स्पष्ट करत अफजलखान ही एक प्रवृत्ती असल्याचे नमूद केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा