दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रातील २० गुंठय़ांवर लागवड करण्यात आलेली मिरची गुणवत्तेच्या तपासणीनंतर आता अमेरिकेला निर्यात होत आहे. या मिरची पिकाचा पहिलाच तोडा अमेरिकेला निर्यात झाल्याने संबंधित प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
गुणवत्तेमुळे निर्यातक्षम बनलेल्या मिरची पिकाच्या प्लॉटमध्येच संस्थेचे अध्यक्ष अभिजित मोकाशी व विश्वजित मोकाशी, महाविद्यालयाचे प्राचार्य बी. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. अभिजित मोकाशी म्हणाले, की शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करून आपला शेतीमाल परदेशात निर्यात करावा तसेच शेतीच्या कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे. त्यासाठी मोकाशी कृषी महाविद्यालय सर्वतोपरी सहकार्य करेल. शेतकऱ्यांची कष्ट करण्याची तयारी आहे, मात्र भाजीपाला पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने किंवा भावात चढउतार असल्याने शेतकऱ्याचे नुकसान होत असते. हे ओळखून खासगी कंपनीशी हमीभावासाठी करार केला आहे. कराड व परिसरातील शेतकरी उसामधून भाजीपाला पिकांकडे येत आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना हा प्लॉट मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास अभिजित मोकाशी यांनी व्यक्त केला. यासाठी कंपनीचे मार्गदर्शक अमोल गेनामे व महेश साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी व उद्यानविद्या विभागाचे प्रा. एस. एम. शिंदे यांनी परिश्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन हवे असेल त्यांनी महाविद्यालयात संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.   
 सदर मिरची लागवडीबाबत माहिती देताना प्राचार्य बी. आर. पाटील म्हणाले, की मिरचीची लागवड २८ जुलै रोजी करण्यात आली. डेमॅन या जातीची निवड करून ५ बाय ६ अंतरावर गादीवाफे सोडून त्यावर ड्रीप लाईन व मल्चिंग पेपर टाकण्यात आला. लागवडीच्या वेळी गादीवाफ्यावर १० किलो शेणखत व १० किलो गांडूळखत टाकण्यात आले तसेच रासायनिक खते १२:६१ व १९:१९:१९ याची प्रत्येकी २ किलो ३ दिवसांच्या अंतराने ६० दिवसांपर्यंत ड्रीपमधून देण्यात आले. वेळोवेळी कीटकनाशकांची व बुरशीनाशकांची फवारणी केली. परदेशात नियात करत असताना कीटकनाशकांचे अंश येणार नाहीत याची व आंतरराष्ट्रीय मान्यता असणाऱ्या कीटकनाशकांची फवारणी केली. साधारणत: ४५ दिवसांपासून झाडाला फुले येण्यास सुरुवात झाली व ६०, ६५ दिवसांत पहिली तोडणी करण्यात आली. त्यातील कीटकनाशकांचा अंश तपासण्यासाठी मिरची बंगलोर येथील प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवण्यात आली. त्या प्रयोगशाळेच्या अहवालात कीटकनाशकांचा ० टक्के अंश आल्यानंतर तोडणी करण्यात आली. पहिली तोडणी साधारण ३२० किलो आली. खासगी कंपनीशी निर्यातीसाठी करार करण्यात आला आहे. त्यांच्याकडून १७ रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला आहे. आतापर्यंत या मिरची पिकासाठी २२ हजार इतका खर्च आला आहे व उत्पादन ५ टन एवढे निघणे अपेक्षित आहे. सर्व खर्च वजा जाता संस्थेला ३० ते ४० हजार निव्वळ नफा मिळेल असा अंदाज तज्ज्ञ प्राध्यापक व्यक्त करत आहेत.

Story img Loader