खून, दरोडय़ासह अनेक गंभीर प्रकरणात आरोपी असणारा स्वप्नील ताशीलदार, अनेक गुन्हेगारांना रिव्हॉल्वर पुरविणारा मनीष रामविलास नागोरी याच्यासह १० जणांवर मोक्का कायद्याखाली कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती करवीरचे पोलीस उपअधीक्षक विठ्ठल पवार यांनी पत्रकारांना दिली.
मोक्काखाली कारवाई होण्यामध्ये संजय किरणगे (रा.इंडी), राकेश किरण कारंडे (रा.शास्त्रीनगर),उमेश गंगाराम सकट (रा.राजेंद्रनगर), तुषार शिवाजी डवरी (विक्रमनगर), विजय तुकाराम देडे (रा.नांदूरगा),प्रकाश धोंडिराम माळी (मिरज), विठ्ठल काशिनाथ सुतार (विक्रमनगर), रामचंद्र कुंडलिक चावरे (शिंगणापूर)यांचा समावेश आहे. ताशीलदारसह हे सर्व आरोपी वेगवेगळ्या गुन्ह्य़ात परस्परांना मदत करत होते. त्यामध्ये खुनाचे तीन, खुनाच्या प्रयत्नाचे दोन, दरोडा एक, जबरी चोरी दोन, दरोडा तयारी एक, मारामारी चार, दुखापत चार, चोरी चार, सरकारी नोकरावर हल्ला, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे चार, अमली पदार्थ बाळगणे एक असे गुन्हे दाखल आहेत.    
८ सप्टेंबर रोजी अमित चंद्रसेन शिंदे याच्या खूनप्रकरणी ताशीलदारसह या आरोपींना अटक करण्यात आली होती. या खुनासाठी मनीष नागोरीने हत्यार पुरविले होते. या गुन्हेगारांची टोळी सक्रिय होती. त्यांच्याविरोधात गांधीनगर पोलीस निरीक्षकांनी कारवाईचा अहवाल पाठविला होता. तो पोलीस अधीक्षकांनी विशेष महानिरीक्षकांकडे सादर केला होता. त्यानुसार ७ डिसेंबर रोजी या सर्वावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याचे पवार यांनी सांगितले.

Story img Loader