अमरावती जिल्ह्य़ात गेल्या १६ दिवसांमध्ये विनयभंगाच्या तब्बल १६ गुन्ह्य़ांची नोंद विविध पोलीस ठाण्यांमध्ये झाल्याने पोलीस वर्तुळही चक्रावून गेले आहे. गेल्या वर्षांत अशा १५४ घटना घडल्या, अशा गुन्ह्य़ांच्या संख्येच्या बाबतीत राज्यात अमरावती जिल्ह्य़ाचा क्रमांक चौथा आहे.
जिल्ह्य़ातील बेनोडा, शिरखेड आणि चिखलदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी विनयभंगाच्या तीन तक्रारी दाखल झाल्या. पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद करून कारवाईही केली. पण अशा वाढत्या घटनांनी पोलीस यंत्रणेसमोर आव्हान उभे केले आहे.
गेल्या १६ दिवसांमध्ये दाखल झालेल्या विनयभगांच्या गुन्ह्य़ांपैकी काही प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुली बळी पडल्या आहेत. अनेक घटनांमध्ये लोकलज्जेस्तव तक्रारी दाखल केल्या जात नाहीत, त्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढते, त्यातून नंतर गंभीर स्वरूपाचे प्रकार घडतात, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्य़ांत विनयभंगाच्या गुन्ह्य़ांचा दर (१ लाख लोकसंख्येमागे घडलेले गुन्हे) १४.९ होता. यावरून भयावहता लक्षात येते.
या पंधरवाडय़ात चांदूर बाजार, पथ्रोट, लोणी, अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे, अचलपूर, आसेगाव या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विनयभंगाच्या घटनांची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी गुन्हेगारांनी महिलांच्या घरांमध्ये शिरून बळजबरी केली आहे. काही ठिकाणी तर भररस्त्यावर विनयभंगाचे प्रकार घडले आहेत.
अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या वर्षांत विनयभंगाच्या ५३ गुन्ह्य़ांची नोंद झाली. हे प्रमाण ग्रामीण भागाच्या तुलनेत कमी झालेले असले, तरी परिस्थिती सामान्य नसल्याचेच ध्वनित होत आहे. मूल्यशिक्षणाचा अभाव, बेरोजगारी, पोलीस यंत्रणेचा वचक नसणे अशी अनेक कारणे यासाठी सांगितली जात आहेत. राज्यात २०१२ मध्ये विनयभंगाच्या ३ हजार ९३५ गुन्ह्य़ांची नोंद झाली, त्यात मुंबई शहरात सर्वाधिक ६१५, ठाणे शहरात २०३, ठाणे ग्रामीण १५५ आणि त्यानंतर चौथ्या क्रमांकावर अमरावती ग्रामीण भागात १५४ घटना घडल्या आहेत. विनयभंगाच्या तक्रारी करण्यासाठी महिला मोठय़ा संख्येने समोर येत आहेत, असे विश्लेषण केले जात असले, तरी या घटना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा आणि सामाजिक व्यवस्था कमकुवत ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे.
विनयभंगाच्या प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण अल्प आहे. पोलीस यंत्रणेच्या लेखी इतर गंभीर गुन्ह्य़ांच्या तुलनेत या गुन्ह्य़ांना दुय्यम स्थान आहे. त्यामुळे गावगुंडांवर वचक राहिलेला नाही. गावपातळीवर अशा गुन्ह्य़ांच्या बाबतीत केवळ चर्चेचे फड रंगतात, पण उपाययोजनांविषयी गावपुढाऱ्यांनाही निर्णय घ्यावासा वाटत नाही. परिणामी अशा घटना वाढत चालल्या आहेत.
अंकुश आवश्यक- रझिया सुलताना
अमरावती जिल्ह्य़ात विनयभंगाच्या वाढत्या घटनांचा मुद्दा चिंताजनक आहे. गावांगावांमध्ये आज शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, पण मूल्यशिक्षणाचा अभाव दिसून येत आहे. पालक आणि मुलांमध्ये संवादहीनता आली आहे. संस्कारक्षम व्यवस्था कमकुवत झाल्याने असे प्रकार वाढत आहेत, असे मत सामाजिक कार्यकर्त्यां रझिया सुलताना यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. गरीबी, बेरोजगारी यातून आलेले नैराश्य आणि झगमगाटी आयुष्याचे आकर्षण यात तरूणांमधील उच्छृंखलता वाढल्याचे हे लक्षण आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही. अशा प्रकरणांमध्ये निर्दोष सुटणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. गावगुंडांना रोखण्याची हिंमत कमी होत चालली आहे. अनेक ठिकाणी तर वजनदार व्यक्तीच्या मुलांनी केलेल्या अत्याचाराची प्रकरणे दाबली जातात. सामाजिक चिंतनाचा हा विषय बनला आहे, असे त्यांनी सांगितले.
अमरावती जिल्ह्य़ात विनयभंगाच्या वाढत्या घटना
अमरावती जिल्ह्य़ात गेल्या १६ दिवसांमध्ये विनयभंगाच्या तब्बल १६ गुन्ह्य़ांची नोंद विविध पोलीस ठाण्यांमध्ये झाल्याने पोलीस वर्तुळही चक्रावून गेले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-08-2013 at 02:21 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Molest incident increasing in amravati district