जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षकाला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शनिवारी न्यायालयाने दिले. मिरज तालुक्यातील सुभाषनगर येथे घडलेल्या विनयभंगाच्या प्रकरणानंतर ग्रामस्थांनी शिक्षकाला चोप देऊन शुक्रवारी पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
सुभाषनगर येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत विलास शंकर क्षीरसागर हा शिक्षक कार्यरत असून इयत्ता ७ वी मधील एका मुलीचा विनयभंग करण्याचा प्रकार त्याच्याकडून घडला होता. हा शिक्षक इयत्ता तिसरीच्या वर्गावर शिकविण्यास आहे. संबंधित विद्यार्थिनीच्या शिक्षकाने वही आणण्यासाठी तिला क्षीरसागरकडे पाठविले होते.
या शिक्षकाने संबंधित पीडित मुलीला विनयभंगाचा प्रकार कोणाला सांगू नकोस अन्यथा लाल शेरा मारून तुला काढून टाकले जाईल, लाल शेऱ्यामुळे तुला कुठे प्रवेशही मिळणार नाही अशी धमकी दिली होती. तानंग (ता. मिरज) येथे क्रीडा स्पर्धेसाठी शाळेतील मुलींना नेण्यात आले होते. त्यावेळीही या शिक्षकाने या मुलींना पंढरपूरला सहलीसाठी नेण्याचा घाट घातला होता. मात्र मुलींनी पालकांची परवानगी नसल्यामुळे पंढरपूरला जाण्यास नकार दिला होता.
शुक्रवारी मुलींच्या मध्ये शिक्षकाबद्दल चाललेली कुजबूज एका महिलेने ऐकली. अधिक चौकशी केली असता शिक्षकाची कृष्णकृत्ये मुलींनी सांगितली. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळेकडे धाव घेतली. या शिक्षकाला विचारण्याचा प्रयत्न पालक करीत असताना तो पळून जाऊन एका शाळेच्या खोलीत लपला होता. ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढून बेदम चोप दिला. त्यानंतर मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पीडित मुलीच्या मामाने या संदर्भात शिक्षकाविरुद्ध विनयभंगाची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी अटक करून शिक्षकाला शनिवारी न्यायालयासमोर उभे केले असता त्याला दि. १५ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Molest lady student custody of teacher