घराशेजारी राहणाऱ्या एका निष्पाप तीन वर्षांच्या बालिकेला स्वत:च्या घरात बोलावून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याबद्दल ६१ वर्षांच्या विकृत वृद्धाला सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दोषी धरून दोन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
राजेशम् नामबय्या येमूल असे या शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हैदराबाद रस्त्यावर विडी घरकुल वसाहतीत १४ ऑक्टोबर २०१२ रोजी रात्री हा प्रकार घडला होता. राजेशम् याने आपल्या घराशेजारी राहणाऱ्या कुटुबातील तीन वर्षांच्या बालिकेला खेळविण्याचे निमित्त करून स्वत:च्या घरी आणले व तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. त्याचवेळी पीडित बालिकेची आई आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद होऊन तपासाअंती आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते. जलदगती सत्र न्यायाधीश कल्पना व्होरे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारतर्फे अ‍ॅड. रामदास वागज व अ‍ॅड. माधुरी देशपांडे यांनी काम पाहिले तर आरोपीतर्फे अ‍ॅड. जी. एस. फुलारी यांनी बचाव केला. मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. अजमोद्दीन शेख व अ‍ॅड. के. आर. बागवान यांनी काम पाहिले.

Story img Loader