कुटुंबातील लहान मुलीस दारू पाजून मारहाण व तिचा विनयभंग झाला असतानाही उंब्रज पोलिसांनी तशी फिर्याद नोंद करून न घेतल्याचा आणि वस्तुस्थितिजन्य वैद्यकीय अहवाल देण्यास उंब्रज येथील शासकीय वैद्यकीय अधिका-यांनी टाळाटाळ केल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी भवानवाडी (ता. कराड) येथील चव्हाण कुटुंबीयांनी गुरुवारपासून कराड तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
भवानवाडी येथील बाहू जगन्नाथ चव्हाण यांच्या कुटुंबातील एक लहान मुलगी दि. ३१ ऑगस्ट २०१३ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एकटी असताना तिला गावच्या हद्दीतील वीटभट्टीच्या पाठीमागे नेण्यात आले. तेथे पूर्वी कोर्टात सुरू असलेल्या तारखेस तू हजर राहायचे नाही असे म्हणून तिला दारू पाजून स्वत: दारू पिऊन काही जणांनी मारहाण केली, तसेच लहान मुलीचा विनयभंग केला. या वेळी लहान मुलीने कशीतरी सुटका करून घेऊन ती घरी आल्यानंतर तिने हा प्रकार घरातील लोकांना सांगितला. त्यानुसार सदर मुलीस बरोबर घेऊन चव्हाण व त्यांचे तांबवे (ता. कराड) येथील पाहुणे विष्णू पांडुरंग पवार हे उंब्रज पोलीस ठाण्यात गेले होते, मात्र तेथील पोलीस अधिकारी व काही कर्मचा-यांनी विनयभंगाची फिर्याद नोंदवून न घेता केवळ अदखलपात्र तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर उंब्रज येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले, मात्र तेथेही वैद्यकीय अधिका-यांनी वस्तुस्थितिजन्य अहवाल देण्यास टाळाटाळ केली. हा सर्व प्रकार पोलीस व वैद्यकीय यंत्रणेने संबंधित आरोपींच्या हितसंबंधामुळे व दबावामुळे केला आहे. याप्रकरणी संबंधितांची सखोल चौकशी करून सदर मुलीस व आमच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, असे बाळू चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा