भाजपचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा गावपातळीवरून सुरू झालेला राजकीय संघर्षमय प्रवास सामाजिक, राजकीय कार्यात उतरणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. त्यांच्या अनुभव विश्वातून खूप काही शिकण्यासारखे व घेण्यासारखे आहे. मुंडे यांच्या निधनानंतर त्यांचा जीवनपट उलगडणारे ‘योद्धा’ नावाचे पुस्तक एक संदर्भ ग्रंथ म्हणून यापुढे प्रत्येक पिढीला उपयुक्त ठरेल, असा विश्वास भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी बुधवारी येथे व्यक्त केला.
ठाणे जिल्ह्य़ातील प्रत्येक ग्रंथालयात हे पुस्तक पोहचले पाहिजे. या ग्रंथालयांसाठी जेवढी पुस्तके लागतील तेवढी पुस्तके आपण विकत घेत असल्याचे जाहीर करीत विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी मुंडे यांना आदरांजली वाहिली. कल्याण जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे, कीर्तनकार श्यामसुंदर सोन्नरमहाराज यांनी ‘योद्धा’ पुस्तकाचे संकलन केले आहे. या पुस्तक विक्रीमधून जी रक्कम जमा होईल, त्यामध्ये लेखकद्वयींकडून आणखी निधी टाकून ती रक्कम दुर्घटनाग्रस्त माळीण ग्रामस्थ व त्यांच्या नातेवाइकांच्या साहाय्यासाठी देण्यात येईल, असे कुऱ्हाडे यांनी सांगितले.
मुंडे यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्याचे अनेक कार्यक्रम झाले. त्या भाषणांचे एकत्रीकरण करून ‘योद्धा’ पुस्तक तयार करण्यात आले. सर्वेश सभागृहात या पुस्तकाचे प्रकाशन विनोद तावडे, संजय केळकर, जगन्नाथ पाटील, केशव उपाध्ये, के. आर. जाधव, रवींद्र चव्हाण, राहुल दामले, ज्योती पाटकर, प्रा. उदय कर्वे, शुभा पाध्ये आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. ‘घटनेच्या ठिकाणी धाव घेऊन अन्यायग्रस्तांना मदत करण्याचा धाडसी स्वभाव मुंडे यांच्यामध्ये होता. कोणत्याही ऐकीव माहितीवर ते विश्वास ठेवत नव्हते. सत्तेत असताना गुन्हेगारांचे त्यांनी निर्दालन केले. ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिजे हा पहिला विचार मुंडे यांनी मांडला होता. सामाजिक, राजकीय असे अनेक पदर त्यांच्या वाटचालीला होते. लोकसभेनंतर महाराष्ट्र विधानसभा काबीज करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न कृतीत उतरण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन सर्वच भाजप नेत्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर डुंबरे, गिरीश वाडेल यांनी प्रयत्न केले.
मुंडेंवरील पुस्तकाच्या विक्रीतील निधी माळीणग्रस्तांच्या मदतीसाठी
भाजपचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा गावपातळीवरून सुरू झालेला राजकीय संघर्षमय प्रवास सामाजिक, राजकीय कार्यात उतरणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. त्यांच्या अनुभव विश्वातून खूप काही शिकण्यासारखे व घेण्यासारखे आहे.
First published on: 16-08-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money comes form sale of mundes book will be given to malin victims