कल्याण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या निवडणूक प्रचाराचे साहित्य वाटप करताना पैशाचा वापर केल्याने मानपाडा पोलिसांनी तिघा जणांविरोधात बुधवारी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. आचारसंहिता भंगाची लोकसभा मतदारसंघात दाखल होणारी ही पहिलीच तक्रार आहे.
दोन दिवसांपूर्वी आनंद परांजपे यांच्या डोंबिवली एमआयडीसी कार्यालयासमोर रिक्षा चालकांना पैसे आणि प्रचार साहित्य वाटप करण्यात येत असल्याची तक्रार मानपाडा पोलिसांकडे एका अज्ञात व्यक्तीने केली होती. त्या आधारे पोलिसांनी घटनास्थळावरून परांजपे यांचे रिक्षेवर लावण्यासाठी तयार केलेले प्रचार साहित्य व तीन जणांसह लाखभर रक्कम जप्त केली होती. पोलिसांनी निवडणूक अधिकाऱ्यांशी याप्रकरणी चर्चा केल्यानंतर प्रचार साहित्य व १२२ रिक्षा चालकांना एक हजार रुपयेप्रमाणे पैसे वाटप करताना आढळून आलेल्या नाझीर करण खान, मुकेश चित्ते व प्रशांत पोपट बागल यांच्या विरुद्ध निवडणूक कायदा कलमातील निवडणूक अपराधाचे कलम १७१ (एच्) अन्वये अदखलपात्र गुन्हा पोलीस उपनिरीक्षक पडारकर यांनी दाखल केला. प्रचार साहित्यावर मुद्रक, प्रकाशक व प्रतींची संख्या नसल्याने त्यांच्यावर निवडणूक आयोग व पोलिसांकडून काय कारवाई केली जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. हे प्रचार साहित्य मुद्रण करणारी प्रेस सील होण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.