मनसे विद्यार्थी आघाडीने केलेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागीय मंडळाने उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या प्रवेशपत्रांमधील बैठक क्रमांकांतील चूक दुरूस्तीसाठी प्राचार्याना सूचना दिली असताना शुक्रवारी पुन्हा नव्याने सूचना देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यासाठी कारणीभूत ठरल्या दुरूस्ती केलेल्या प्रवेशपत्रासाठी काही विद्यालयांकडून पैसे घेण्यात येत असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.
फेब्रुवारी-मार्च २०१४ मध्ये होणाऱ्या १२ वी परीक्षेसाठी आवेदनपत्र प्रथमच ऑनलाइन पद्धतीने स्वीकारल्यामुळे पुढील सर्व कामे संगणकाव्दारे करण्यात आली. त्यामुळे काही प्रवेशपत्रांमध्ये त्रुटी राहिल्याचे मान्य करीत मंडळाचे विभागीय अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी सर्व शाळांच्या प्राचार्याना प्रवेशपत्रात दुरूस्ती करण्यासाठी पत्रक काढले. त्यात प्रवेशपत्रावरील सर्व प्रकारच्या नोंदी काळजीपूर्वक तपासण्याची सूचना करण्यात आली. प्रवेशपत्रात अक्षरी बैठक क्रमांकाची अपूर्ण असलेली नोंद पूर्ण करण्यासही बजावण्यात आले. परंतु असे असतानाही त्यांच्यावर दुसऱ्याच दिवशी प्राचार्याना नव्याने सूचना देण्याची वेळ आली. काही विद्यालयांच्या प्राचार्यानी दुरूस्ती केलेले प्रवेशपत्र देण्यासाठी विद्यार्थ्यांकडे १०० रूपयांची मागणी करण्याचे प्रकार घडले. त्यासंदर्भात मनसे विद्यार्थी आघाडीने मंडळाकडे विचारणा केल्यावर मंडळाने ‘कोणत्याही विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्रातील दुरूस्तीसाठी शुल्क आकारू नये’ अशी नव्याने दुरूस्ती करून पुन्हा एकदा सर्व प्राचार्याना सूचनापत्रक पाठविले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा