मराठी आणि बंगाली चित्रपट हे आशयात्मकदृष्टय़ा दर्जेदार असतात. कितीतरी चांगले, वेगवेगळे विषय मराठी चित्रपटांमध्ये हाताळले जातात, असे उद्गार जेव्हा वारंवार बॉलिवूडमधील प्रथितयश लोकांकडून ऐकू येतात, तेव्हा एकूणच चित्रपटसृष्टीतील बदलत्या प्रवाहांची दखल त्यांनाही घ्यावी लागते आहे हे निश्चितपणे समजून येते. हिंदी चित्रपटांचे व्यावसायिक यश हे प्रमाण मानले तरी गेल्या काही वर्षांत सातत्याने राष्ट्रीय पुरस्कारांवर पकड राहिली आहे ती मराठी, बंगाली आणि दाक्षिणात्य चित्रपटांची. त्यातही मराठी चित्रपटांची आघाडी मोठी आहे. शिवाय, कमी बजेट-मोठमोठय़ा कलाकारांचा अभाव, तंत्राचा अभाव अशा सगळ्याच गोष्टींचा अभाव असताना चित्रपट महोत्सवांपासून ते तिकीटबारीपर्यंत प्रभाव मात्र याच चित्रपटांचा आहे, हे सत्य बॉलिवुडच्या मंडळींना नाकारता येत नाही आहे. आणि म्हणूनच हिंदीतील नावाजलेले कलाकार, निर्माते-दिग्दर्शक आता मराठी चित्रपटनिर्मितीकडे वळले आहेत. आत्ताच्या घडीला अक्षय कुमार, निखिल अडवाणी, रितेश देशमुख आणि यात चौथे नाव येऊन मिळाले आहे ते दिग्दर्शक विक्रम भट्ट. अशा चार नामांकित बॉलिवूड मंडळींच्या मराठी चित्रपटनिर्मितीचा बोलबाला सुरू आहे. हे चित्रपट कोणते, या मंडळींचा त्यामागचा नेमका उद्देश काय असेल..याचा हा आढावा.
खरेतर, अमिताभ बच्चन यांच्या एबीसीएल कॉर्पोरेशनने उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘विहीर’ चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी उचलली आणि त्या चित्रपटाला यश मिळाले तेव्हापासूनच याची सुरूवात झाली होती. यापुढेही एखादी चांगली पटकथा असेल तर नक्कीच आपला त्यालाही पाठिंबा असेल, असे अमिताभ बच्चन यांनी त्यावेळेस सांगितले होते. पण, तसा योग अजून तरी आलेला नाही. दरम्यानच्या काळात ‘नटरंग’, ‘बाबू बॅंड बाजा’, ‘जोगवा’, ‘चॅम्पियन’ अगदी यावर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा ‘धग’ अशा अनेक मराठी चित्रपटांना मिळालेले यश बॉलिवुडच्या मंडळींनीही पाहिले. एकीकडे कितीही कोटींचे आकडे पार केले तरी हिंदी चित्रपटांच्या एकूणच दर्जाबद्दल नेहमीच प्रश्नचिन्ह उभे केले जाते. त्यामुळे हिंदीतही पैसा मिळवण्यासाठी तद्दन व्यावसायिक चित्रपट करायचे आणि मग छोटय़ा बजेटच्या पण चांगल्या आशयाच्या चित्रपटांना पाठिंबा द्यायचा हा सिलसिला तिथेही सुरू झाला. त्याचवेळी मराठी चित्रपटांचा एक चांगला पर्याय या मंडळींपुढे उभा राहिला. त्यासाठी पुढाकार घेतला तो रितेश देशमुखने. मूळ मराठी पण हिंदीतच अभिनेता म्हणून नावलौकिक मिळवणारा रितेश हा एका अर्थाने दोन्हीकडचा दुवा झाला आहे. म्हणजे हिंदीतील लोकांना कोणी चांगला मराठी लेखक-दिग्दर्शक हवा असेल तर थेट रितेशकडे विचारणा केली जाते. रितेशने स्वत: रवी जाधव दिग्दर्शित ‘बीपी – बालक पालक’ चित्रपटाच्या निर्मितीची सूत्रे हातात घेतली. रितेशमुळे ‘बीपी’ हिंदीत अनेक कलाकारांपर्यंत पोहोचला. ‘बीपी’ला तिकीटबारीवर चांगलेच यश मिळाले आणि समीक्षकांनीही चित्रपटाला पसंती दिली.
त्यापाठोपाठ अभिनेता अक्षय कुमारनेही अश्विनी यार्दीबरोबर ‘ग्रेझिंग गोट प्रॉडक्शन’ बॅनरखाली मराठी चित्रपट निर्मिती करत असल्याचे जाहीर केले. अशोक व्हटकरांच्या ‘७२ मैल’ या कादंबरीवर त्याच नावाने चित्रपटाची निर्मिती अक्षयने केली आहे. आपण जे जे मराठी चित्रपट पाहिले ते आपल्याला खूप आवडले. त्याचवेळी अश्विनीने ‘७२ मैल’ कादंबरीची कथा त्याच्या कानावर घातली. ती अक्षयला आवडल्यानंतर या चित्रपटाच्या निर्मितीची जुळवाजुळव सुरू झाल्याचे अक्षय कुमारने सांगितले. ग्रेझिंग गोट निर्मित आणि राजीव पाटील दिग्दर्शित ‘७२ मैल’ हा चित्रपट ९ ऑगस्टला प्रदर्शित
होणार आहे. या चित्रपटापाठोपाठ अंतर नावाच्या मराठी चित्रपटाची निर्मितीही अक्षयच्या या बॅनरखाली सुरू होणार असल्याची माहितीही अश्विनी यार्दी यांनी दिली. एकीकडे रितेश आणि अक्षयसारख्या कलाकारांनी मराठी चित्रपटनिर्मितीत उडी घेतल्यानंतर दिग्दर्शकांनीही मागे रहायची गरज काय? तरीही निखिल अडवाणीसारख्या दिग्दर्शकाला मराठी चित्रपटनिर्मितीत रस आहे हे ऐकल्यावर भल्याभल्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
करण जोहर आणि आदित्य चोप्राच्या कंपूतून बाहेर पडलेल्या निखिलने ‘डी डे’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण करायचा प्रयत्न केला आहे. करण जोहरच्या ‘धर्मा प्रॉडक्शन’चा निरोप घेतल्यानंतर आपण काहीसे भरकटलो होतो. त्यामुळे मधल्या काळात आलेल्या चित्रपटांनी यशही दिले नाही. ‘डी डे’ साठी मात्र आपण खूप वेळ घेतल्याचे सांगणारा निखिल अडवाणी चक्क मराठीत लोकमान्य टिळकांवरच्या चरित्रपटाची निर्मिती करतो आहे. सुबोध भावे या चित्रपटात मुख्य भूमिके त आहे. चांगला मराठी चित्रपट जर हिंदीच्या जवळपास पोहोचत असेल तर एक चित्रपट उद्योग म्हणून हे आर्थिक समीकरण बळकट करणारे तर आहेच पण नक्कीच आपल्या व्यवसायाचा दर्जा उंचावण्यासही मदत होईल, असे मत निखिल अडवाणीने व्यक्त केले आहे.
भट्ट कॅ म्प हा बॉलिवुडमधला स्वतंत्र प्रवाह राहिला आहे. एरव्ही थरारपटात रमणाऱ्या विक्रम भट्टने हिंदीतही ‘अंकुरा अरोरा मर्डर केस’सारखा वास्तव घटनेवर चित्रपट करत दिग्दर्शक म्हणून आपला रोख बदलला आहे. आता तर मराठीत तो एका रोमॅंटिक चित्रपटाची निर्मिती करतो आहे. ‘एक दुसरे के लिए’ असे या चित्रपटाचे नाव असून अश्विनीकुमार पाटील यांचे दिग्दर्शन असणार आहे. अनिकेत विश्वासराव, अमृता खानविलकर आणि अभिजीत खांडकेकर यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. विक्रम भट्टना ही निर्मिती का करावीशी वाटतेय हे अजून त्याने सांगितलेले नाही. पण, एकंदरीतच हिंदी चित्रपटांमध्ये पैसा आहे, नावही आहे. पण, मराठी चित्रपटांचा आशय आणि त्यांची मांडणी यामुळे दर्जेदार कलाकृतीचा निर्माता म्हणून मिळणारे समाधान आणि लौकिक यामुळे हिंदीतील नामवंताची पावले मराठीकडे वळत आहेत.
विक्रम भट निर्मित ‘एक दुसरे के लिए’ या आगामी मराठी चित्रपटातील दृश्यात अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव आणि अभिजीत खांडकेकर