निवडणुकीच्या हंगामात गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा काही कोटींच्या घरात बेहिशोबी रोकड जप्त केली जात आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली यांसारख्या शहरांमध्ये काही दिवसांपुर्वी पोलिसांनी लाखो रुपयांची रकड जप्त केली. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या पोलीस विभागांनी बेहिशोबी रोकड, दारूची वाहतूक थांबविण्यासाठी खास पथके तयार केली आहेत. निवडणुकीची तारीख जशी जवळ येईल तशी बेहिशोबी रोकड, दारूच्या वाहतुकीत वाढ होईल, हे स्पष्टच आहे. मानपाडा पोलिसांनी मध्यंतरी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या कार्यालयाबाहेरून दीड लाखाची रोकड जप्त केली. काही रिक्षा चालकांना पैसे वाटताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. मात्र, ठाणे जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली दौलतजादा लक्षात घेता परांजपे यांच्या कार्यालयाबाहेरील ही रोकड म्हणजे हिमनगाचे टोक असल्याची चर्चा आता रंगली आहे.
ठाणे, नवी मुंबई, पनवेल, वसई-विरार, भिवंडी, कल्याण यांसारख्या पट्टय़ांत काही राजकीय नेत्यांनी अशा प्रकारे पैसे वाटण्यासाठी खास माणसे ठेवली असून इच्छित स्थळी पैसे पोहोचविण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. बडय़ा, आलिशान गाडय़ांमधून अशी रोकड वाहतूक करण्याची क्लृप्ती काही मंडळींनी लढविली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्यामुळे मर्सिडीज, बीएमडब्लू, ऑडी अशा आलिशान गाडय़ांची तपासणी जोरात सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे पोलीस दलातील एका वरिष्ठ सूत्राने वृत्तान्तला दिली. एरवी वाहतूक पोलीस नियम मोडणाऱ्या रिक्षा, मोटरसायकलस्वार तसेच लहान गाडय़ांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हटकतात, मात्र महागडय़ा गाडय़ांमधील प्रवाशांना सहसा हटकले जात नाही, अशा तक्रारी सातत्याने ऐकू येत असतात. रात्रीच्या वेळी मद्य प्राशन करून गाडी चालविणाऱ्या चालकांना शोध घेताना सरसकट सर्वच वाहनांची तपासणी केली जाते, मात्र दिवसभरात अशी तपासणी अपवादानेच होत असताना दिसते. मात्र, निवडणुकीच्या हंगामात महागडय़ा वाहनांची तपासणी मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयामार्फत ठाणे शहर, भिवंडी, मुंबई-नाशिक महामार्गावर विशेष पथके तैनात केली असून या ठिकाणी अशा वाहनांची तपासणी केली जात आहे. ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही असे तपासणी नाके तैनात करण्यात आले असून तेथेही महागडय़ा वाहनांची आवर्जून तपासणी करा, असे निर्देश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीत बेहिशोबी पैशाची वाहतूक मोठय़ा प्रमाणावर सुरू झाल्याने ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी रिक्षा, टमटम यांसारख्या लहान वाहनांसह लँड क्रुझर, टाटा सफारी, इनोव्हा, फॉरच्युनर अशा महागडय़ा आलिशान गाडय़ांकडेही आपला मोर्चा वळविला आहे. नाक्यानाक्यावर गस्तीसाठी उभे असणारे पोलीस कर्मचारी एरवी लहान गाडय़ांची आवर्जून तपासणी करतात, मात्र मोठय़ा, महागडय़ा गाडीतून प्रवास करणाऱ्यांना फारच कमी वेळा हटकतात, असा सर्वसाधारण अनुभव असतो. तपासणी नाक्यांवर मर्सिडीज, बीएमडब्लू यांसारख्या महागडय़ा गाडय़ांची कसून तपासणी केली जात असल्याचे चित्र फारच कमी वेळा नजरेस पडते. ठाणे आणि नवी मुंबईसारख्या शहरात मात्र गेल्या काही दिवसांपासून जागोजागी बडय़ा, महागडय़ा गाडय़ांची तपासणी सुरू करण्यात आली असून फॉरच्युनर, टाटा सफारी यांसारख्या गाडय़ा तर पोलिसांच्या ‘हीटलिस्ट’वर असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
पोलीस, नेत्यांच्या वाहनांची तपासणी करतील?
निवडणुक काळात बेहिशोबी पैशाची वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या मोहिमा आखण्यास सुरुवात केली असली तरी राजकीय नेत्यांच्या वाहनांची तपासणी करण्याची धमक पोलीस दाखवतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ठाणे, नवी मुंबईतील बडय़ा राजकीय नेत्यांकडे फॉरच्युनर, लँड क्रुझर, इनोव्हा यांसारख्या एसयूव्ही प्रकारात मोडणाऱ्या गाडय़ांची कुमक दिसून येते. ही वाहने पोलीस थांबवतील का, असा सवालही उपस्थित होत आहे.