मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या कामाचे मार्केटिंग करण्याचे मुख्यमंत्र्याचे आदेश शिरसावंद्य मानत एमएमआरडीएने शनिवारी मुख्य सचिव, महानगर आयुक्त आणि पत्रकारांना मोनोची सैर घडवून मुंबईकरांना आणखी एक स्पप्न दाखविले. मात्र ऑगस्टमध्ये ही मोनो प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता असताना आणि अजून काम पूर्ण झालेले नसतानाही मोनोचा हा फेरफटका खरोखरच मुंबईकरांसाठी होता का, अन्य कोणासाठी याची चर्चा आता रंगू लागली आहे.
गेले वर्षभर एमएमआरडीए या ना त्या कारणाने मुंबईकर आणि राजकारण्यांच्या टीकेचे लक्ष्य ठरली आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून आणि आश्वासनपूर्तीच्या नवनव्या तारखा जाहीर करूनही प्रकल्प कार्यान्वित होत नसल्यामुळे प्राधिकरण टीकेचे लक्ष्य ठरले आहे. त्यातच एमएमआरडीएच्या कारभाराची चौकशी करावी, श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी करून राष्ट्रवादीनेही विरोधकांच्या टाळीला टाळी देत मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले आहे. त्यामुळे येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये एमएमआरडीचा कारभार हा प्रचाराचा मुद्दा ठरण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्र्यांनी आतापासूनच प्राधिकरणाच्या प्रकल्पांना गती देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रकल्पांची गती वाढवा, कामांची प्रसिद्धी करा, असे आदेशच त्यांनी एमएमआरडीएला दिले आहेत.
त्यानुसार ‘इंडिया शायिनग’प्रमाणे एमएमआरडीएच्या प्रकल्पांची जाहिरातबाजी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मोनोच्या फेरफटक्याचा घाट घालण्यात आल्याचे समजते. एमएमआरडीएचे आयुक्त राहुल अस्थाना महिनाअखेर सेवानिवृत्त होत असून अतिरिक्त आयुक्त एस.व्ही. आर. श्रीनिवास आणि अश्विनी भिडे बदलीच्या प्रतिक्षेत आहेत. मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया हेही मेअखेर सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे आपल्या कारकीर्दीत काहीच झाले नाही, अशी खंत मुख्य सचिव आणि आयुक्तांच्या मनात राहू नये, तसेच मुंबईकरांनाही आणखी एक स्वप्न दाखवावे आणि प्रसारमाध्यमांनाही खुष करावे अशी अनेक कारणे मोनोची ही सैर घडविण्यामागे आल्याचे बोलले जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा