टॉपर्सची खाण समजल्या जाणाऱ्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ९०च्या पुढची वाटचाल काहीशी खुंटली असून यावेळी विज्ञान आणि वाणिज्य अशा दोन्ही शाखांमध्ये आंबेडकर महाविद्यालयाचे टॉपर चमकू लागले आहेत. याउपरही शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची गळती म्हणजे सदैव ५० च्यावर ९० टक्के गुण प्राप्त केलेले विद्यार्थी या महाविद्यालयाने दिलेले आहेत. गेल्यावर्षी ७८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्याच्यावर कमाई केली होती. मात्र यावर्षी केवळ २७ विद्यार्थी तेथपर्यंत मजल मारू शकले. महाविद्यालयात एकूण ६६८ विद्यार्थी होते. त्यापैकी १०७ विद्यार्थ्यांना ८५ टक्क्याच्यावर गुण प्राप्त झाले आहेत तर २७ विद्यार्थी ९० टक्क्याच्यावर आहेत. महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. यासंदर्भात प्राचार्य डॉ. डी.के बुरघाटे म्हणाले, यावर्षी अभ्यासक्रम बदलला. दोन पेपरचा एकच पेपर केल्यामुळे आणि दोन पेपरमध्ये अंतर असल्याने विद्यार्थ्यांचे लक्ष भरकटण्यास पुरेसा वाव होता. त्यामुळेच निकाल कमी लागला.
दुसरीकडे आंबेडकर महाविद्यालयाने विज्ञान आणि वाणिज्य या दोन्ही शाखांमध्ये टॉपर्सची कमाई करीत शिवाजी विज्ञानची मक्तेदारी मोडीत काढली. दरवर्षीच या दोन्ही महाविद्यालयांमध्ये प्रवेशाबरोबरच कोणत्या महाविद्यालयाचा टॉपर्स बाजी मारेल, याकडेही लक्ष असते. गेल्यावर्षी ९० टक्क्याच्यावर महाविद्यालयाचे ३२ विद्यार्थी होते. यावेळी ३६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांच्यावर गुण प्राप्त केले आहे. महाविद्यालयाचा कॉमर्सचा  निकाल ९७ टक्के तर विज्ञानशाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. महाविद्यायलात विज्ञानचे एकूण ३२० विद्यार्थी होत तर तेवढेच वाणिज्यचे विद्यार्थी परीक्षेला बसले होते. प्राचार्य डॉ. मालती रेड्डी म्हणाल्या, महाविद्यालयाचे व्यवस्थापन, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची व्यक्तिगत मेहनत यामुळेच महाविद्यालयाला चांगले यश लाभू शकले. अकरावी प्रवेशाच्यावेळी महाविद्यालयात राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांबरोबर सीबीएसईचेही विद्यार्थी येतात. सीबीएसईपेक्षा स्टेट बोर्डाचे विद्यार्थी चांगली प्रगती करतात, असे त्यांचे म्हणणे होते. पूर्वी अभ्यासक्रमाच फरक होता मात्र आता दोन्ही बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये कोणताच फरक नसल्याचे रेड्डी म्हणाल्या.

Story img Loader